Ahmednagar News : शिर्डी मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार आहे. शिर्डी मतदारसंघ आमचे कुटूंब आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावलीनिमित्त पाच किलो मोफत साखर देण्याच्या योजनेचा शुभारंभ अस्तगावसह विविध गावांमध्ये करण्यात आला. येथील सावता मंदिराच्या प्रांगणात झाला.
त्याप्रसंगी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच सविता चोळके, वाल्मिकराव गोर्डे, नंदकुमार गव्हाणे, नंदकुमार जेजुरकर, गणेशचे माजी संचालक विजय गोर्डे,
बाजार समितीचे संचालक संतोष गोर्डे, सुर्यकांत जेजुरकर, निवास त्रिभुवन, बाबुराव लोंढे, केशवराव चोळके, इलाहिबक्स तांबोळी, नवनाथ नळे, रवींद्र जेजुरकर, अविनाश जेजुरकर, बशीर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यंदा दिवाळीला मतदारसंघातील कुटूंबांना साखर द्यावी, असे महिन्यापासुन मनात होते. त्यामुळे एक महिन्यापासुन साखरेच्या पाच किलोचे पॅकिंग करण्याचे काम सुरु होते, असे सांगुन खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले,
गणेश परिसरातील ज्यांनी गणेशला विरोधी मतदान केले त्यांनाही आपण २७०० रुपये भाव दिला. हे फक्त महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच करू शकतात. वैचारिकतेचे काही लोक आहेत, त्यांना विखे पाटलांनी दिलेले पैसे चालतात, विखे पाटलांची साखर चालते; परंतु विखे पाटील चालत नाही.
ठिक आहे; परंतु हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. गणेशवरील आपली सत्ता गेली, पण या भागातील जनतेशी ऋणानुबंध आहेत. हे संबंध टिकविले. हे संबंध एखाद्या संस्थेमुळे नाहीत. जन्माचे नाते, माणुसकीचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
विखे पाटील परिवारासाठी हा राहाता तालुका जेवढा जवळ होता तो आजही तेवढाच जवळ आहे. या राहाता तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आमच्याच परिवारातील आहे. मतदारसंघातील जनतेची दिवाळी गोड व्हावी,
प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, हा आमचा परिवार आहे. सहा महिन्यात या मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत येथे आणणार आहोत. १० हजार मुलं सहा महिन्यात नोकरीला लावणार, असेही खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.