Ahmednagar News : राहुरी तालुक्यात यावर्षी ५० टक्क्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात आजच पाण्याच्या टँकरची मागणी सुरु झाल्याने शासनाने मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये.
शासनाच्या निर्णयास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. शासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास तालुक्याचे वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ.प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिला. यावेळी तालुक्याचे वतीने तहसीलदार चंद्रजित रजपूत व मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले.
काल सकाळी ११ वाजता आ.तनपुरे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना आ. तनपुरे म्हणाले, समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार राज्य शासनाने मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये गोदावरी खोऱ्यातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आज धरणामध्ये २३ टीएमसी पाणी साठा उपलब्ध असून त्यापैकी मृत साठा वगळता मुळा धरणातून २.१० टी एम सी पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील शेतकरी सर्वसामान्य वर्गात संताप निर्माण झाला आहे. शासनाने जो समन्यायी कायदा केला आहे, तो खरे विषमन्यायी कायदा म्हणावा लागेल.
कारण यावर्षी तालुक्यात अजिबातच पाऊस झाला नाही. ५० टक्क्या पेक्षाही पाऊस कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा शासनाने तालुक्यात अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही.
आजच तालुक्यातील अनेक गावात टँकरने पिण्यासाठी व जनावरासाठी पाणी देण्याची मागणी सुरु झाली आहे. काही गावात तीव्र पाण्याची टंचाई झाली आहे. उलट जायकवाडी धरणात मुळा धरणातून २.१० टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यातील ५० टक्केच पाणी जायकवाडीला जाऊन उर्वरित ५० टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे.
मुळेतून दिलेल्या पाण्याचा वापर तेथे दारूच्या कारखान्यांना इतर कामाना वापरत असताना राहुरी तालुक्यातील जनता मात्र पाणी मिळेनासे झाले आहे. मग हा कसला समन्यायी कायदा तो आम्हाला मान्य नसून आम्ही जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी तीव्र विरोध करणार असल्याचे सांगून त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे सांगून या बाबत शासनाने फेर विचार करावा, अशी मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तहसीलदार रजपूत यांनी शेतकऱ्यांच्या भावना पाणी सोडण्याबाबत तीव्र असून त्या शासनास कळवितो, असे सांगितले.