आपल्या संस्कृतीत मोठे कुटुंब ही अगदी सामान्य बाब आहे. त्यामुळे महिलांनी ८ किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालावीत, असे अजब आवाहन रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी केले आहे.
गत तीन दशकांपासून जन्मदर सातत्याने घसरत चालल्याने रशियाची लोकसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांच्याकडुन हे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक रशियन जनता परिषदेला संबोधित करताना पुतीन यांनी काही जात समूहांची उदाहरणे दिली. या समूहातील महिला अजूनही चार, पाच मुले जन्माला घालतात. रशियन राष्ट्रपतींनी महिलांना आपल्या आजी, पणजीचा आदर्श घेण्यास सांगितले.
आपल्या आजी, पणजीला सात, आठ किंवा त्यापेक्षा अधिक मुले होती, ही आपली संस्कृती आहे. आपण या संस्कृतीचे जतन केले ने पाहिजे. मोठे कुटुंब सर्वांसाठी आदर्श बनले पाहिजे आणि आपल्या जीवनाचा तो एक भाग असला पाहिजे, असे पुतीन म्हणाले.
कुटुंब हा केवळ समाज, देशाचा पाया नसून ही एक आध्यात्मिक घटना आहे, नैतिकचा स्रोत आहे, असा युक्तिवादही पुतीन यांनी आपल्या आवाहनाच्या समर्थनार्थ केला. येत्या काही दशकांत रशियाची लोकसंख्या वाढ हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, हेच रशियाचे भविष्य आहे, असे पुतीन म्हणाले.
१९९० सालापासून रशियाची लोकसंख्या सातत्याने घसरत चालली आहे. यावर्षी रशियन लोकसंख्या साडेपाच लाखांनी घटली, युक्रेन बुद्ध यामागील प्रमुख कारण आहे. युद्धामुळे सुमारे ९ लाख लोकांनी देश सोडला.
युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता व भविष्याच्या चिंतेमुळे रशियन दाम्पत्य मुले जन्माला घालण्यास अनुत्सुक आहेत. एका रशियन खासदाराने तर जन्मदर वाढीसाठी तुरुंगात कैद ४५ हजार महिला कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा सल्ला दिला आहे.