Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. बाजारपेठ, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) याला सोमवारी पहाटे अटक केली.
आळेफाटा (पुणे) येथून त्याला अटक केली. तो नातेवाईकाकडे लपून बसला असताना पोलिसांनी कारवाई केली. ३ फेब्रुवारीपर्यंत कटारियाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. सुरूवातीला बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २८ कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सुमारे १५० कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
परंतु पोलिसांनी कर्ज प्रकरणांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ केल्यानंतर ही रक्कम २९१ कोटी २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन माजी संचालक, दोन शाखाधिकाऱ्यांसह कर्जदारांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, तपासाला आता गती आली आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया याला सोमवारी पहाटे अटक केल्यानंतर दुपारी उपअधीक्षक खेडकर यांच्या पथकाने त्याला विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले. सरकारी वकील मंगेश दिवाणे व उपअधीक्षक खेडकर यांनी सरकारतर्फे बाजू मांडली.
कर्ज वितरण करताना संचालक मंडळांने कर्जतारण मालमत्तेचे बनावट व वाढीव मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादित कर्ज वितरण केले. कर्ज मंजूर करताना त्याच्या बदल्यात रोख रकमा स्वीकारल्या. माजी अध्यक्ष अशोक कटारिया याच्या खात्यावर एका कर्जदाराच्या खात्यातून ३० लाख रूपये वर्ग करण्यात आले.
कटारिया याने ही रक्कम मर्चेंट बँकेचे कर्ज परतफेड करण्यासाठी वापरली. हे व्यवहार संशयास्पद असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. कर्ज वितरणासाठी बँकेतून ७२ कोटी ७५ लाख २२ हजार ५५८ रूपये रोख स्वरूपात काढण्यात आले तसेच थकीत कर्जदारांचे कर्ज नियमित करण्यासाठी १० कोटी ८६ लाख ७४ हजार ९०० रूपये ‘एचआयओबीटी’ माध्यमातून कर्जदारांना देण्यात आले ही मदत कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली,
याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संशयित आरोपीच्या वतीने वकील महेश तवले व संजय दुशिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कटारियाला ३ फेब्रुवारी पर्यंत कोठडी ठेवण्याचा आदेश दिला.