Agricultural News : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो.
पशु पालनासाठी लागणारे खाद्य म्हणजे ज्वारीचा कडबा, शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारीची प्रेरणी करतात; परंतु दिवसेंदिवस ज्वारीच्या कडब्याला असणारी मागणी कमी झाल्याने शेतकऱ्यांचा पिकावर झालेल्या खर्चही वसूल होत नाही.
पाच ते सहा वर्षांपूवी ज्वारी पिकाची काढणी झाली की, दूधउत्पादकांची कडबा खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असे. त्यामुळे कडब्याला चांगला भाव मिळत असे. ३ ते ४ वर्षांपासून अनेक दूध उत्पादक दुभत्या जनावरांसाठी मुरघासाचा वापर करू लागले आहेत.
मुरघास बनविण्याची प्रक्रिया सोपी असून, कमी खर्चिक आहे. शेतीमध्ये मका, या पिकाचे उत्पादन घेऊन त्यापासून मुरघास बनवला जातो. हा मुरघास मका ची प्रेरणी केल्यापासून ४ महिन्यांत तयार होतो, तो गोण्यांमध्ये साठवणूक करून जनावरांना दिला जातो,
त्यापासून दुधाचे उत्पादनही चांगले मिळते व खाद्यावरील खर्चही कमी येतो, असे दुग्ध व्यवसायिकांचे म्हणणे आहे. मजुरांची कमरता व मजुरीचे वाढलेले दर, यामुळे ज्वारीचे पीक घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
कडब्याला चांगला भाव मिळेल व पिकावर झालेला खर्च वसूल होईल, या आशेने शेतकरी ज्वारी पिक घेत असतो. ज्वारी पिकासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत एकरी १० ते १२ हजार रुपये खर्च होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस कडब्याची मागणी कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दिवसेंदिवस शेतीला लागणारे भांडवल वाढत आहे, मजुरीचे वाढलेले दर व शेतमजुरांची कमतरता, त्यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. कडब्याला मागणी कमी असल्यामुळे पशुपालक कमी दराने मागणी करतो, त्या दरात परवडत नाही – वैभव ढोरमले, शेतकरी.