Ahmednagar News : यंदा तसा जिल्हाभर पाऊस कमीच झाला. परंतु नगर तालुक्यात मात्र पावसाने पाठच फिरवली. तालुक्यातील बोटावर मोजण्याजोगी गवे सोडली तर बहुतांश गावात समाधानकारक पाऊस झालाच नाही.
त्यामुळे आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. आता मार्च सुरु झाला असला तरी पावसाळा यायला खूप अवकाश असून आधी कडक उन्हाळा तोंडावर आहे.
त्यामुळे सध्या नगर तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळाचे सावट असून विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळ्यात अनेक नद्या वाहत्या झाल्याच नाहीत त्यामुळे लहान मोठ्या तलावांना पाण्याचा स्पर्शदेखील झाला नाही.
त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. डोंगर उतारावर वसलेल्या अनेक गावांनी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भूजल पातळीत समाधानकारक वाढ झालीच नाही. रब्बी पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवला आहे. पाण्याअभावी कांद्याची वाताहात झाली.
उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. कांद्याच्या क्षेत्राची जागा ज्वारी, हरभरा, चारा पिकांनी घेतली. साधारणपणे मार्च अखेरीस पाण्याचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात होणाऱ्या गावांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
थंडीसह अवकाळी पावसाने जिरायत पट्ट्यातील ज्वारीचे पीक जोमदार आले होते. परंतु, रानडुकरांच्या उपद्रवाने ज्वारीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेले बंधारे, तलाव दुरुस्ती, नद्यांचे खोलीकरण यामुळे पाण्याच्या समस्येवर मात करण्यात चांगले यश आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसून आहे.
परंतु, चालू वर्षी बंधारे, तलाव, विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. पिंपळगाव माळवी तलावातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. डोंगर दऱ्या हिरवाईने नटलेल्या असतात. वन्य प्राणी, पशुपक्षी स्वच्छंदपणे बागडताना दिसतात. परंतु, पावसाअभावी सर्व चित्र पालटले आहे.
उन्हाळ्यात इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, मदडगाव, मांडवे, भोईर पठार, दशमी गव्हाण, भोईरे खुर्द, नारायण डोहो, माथणी, बाळेवाडी,
उक्कडगाव, कोल्हेवाडी या गावांमध्ये तर कायमच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे संकट आणखी गडद होणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने विकतच्या टँकरने पाणी घालून फळबागा सध्या शेतकरी जगवत आहे. परंतु हे जास्त काळ शक्य होणार नाही. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने फळबागांचे भवितव्य धोक्यात आले आहे.