Impact of Vaccination : कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का ?

Ahmednagarlive24 office
Published:
Impact of Vaccination

Impact of Vaccination : कोरोना महामारीनंतर अचानक हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या, त्यातही खासकरून तरुणांच्या संख्येत दिसणारी वाढ पाहून अनेकांनी कोविड-१९ लसीशी त्याचा संबंध जोडला होता. या लसीमुळे हृदयविकाराची शक्यता वाढत असल्याचे मत मांडले जात होते.

मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हे मत पूर्णतः खोडून काढ़ले आहे. हृदयविकाराच्या झटक्यांना कोविड-१९ लस कारणीभूत नसून, वैयक्तिक जीवनशैली तसेच मोठ्या प्रमाणावरील मद्यपान यांसारखे घटक जबाबदार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीत शनिवारी झालेल्या ‘एनए ‘एनएनआय डायलॉग – नेव्हिगेटिंग इंडियाज हेल्थ सेक्टर’ या परिसंवादात त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, आजकाल एखाद्यास हृदयविकाराचा झटका आला की लोकांना वाटते तो कोविड लसीमुळेच आला आहे.

परंतु, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) याबाबत सखोल अभ्यास केला आहे. त्यातून कोविड लस हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणे आहेत.

उदाहरणार्थ, आपली जीवनशैली, तंबाखूचे सेवन, अतिरिक्त मद्यपान, पण कधी कधी लोकांमध्ये अपमाहिती पसरते आणि त्यातून एक लोकानुबोध म्हणजेच पर्सेप्शन तयार होते. पण आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे आहेत, ते सर्व डेटाच्या आधारे घेतले पाहिजेत, त्यांना वैज्ञानिक संशोधनाची पार्श्वभूमी असली पाहिजे.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, कोविड-१९ लस ही देशातील तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका उद्भवण्यास जबाबदार नसून, कोविडोत्तर उपचार, अचानक मृत्यू होण्याचा त्या कुटुंबाचा इतिहास आणि विशिष्ट जीवनशैली वर्तन ही त्याची कारणे आहेत. देशातील ४३ रुग्णालयांच्या (टर्शरी केअर हॉस्पिटल्स) सहभागाने आयसीएमआरने हा अभ्यास केला होता.

अचानक मृत्यूस हे जबाबदार

धूम्रपानाची सध्याची सवय, वारंवार मद्यपान, अलीकडच्या काळातील अतिरिक्त मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन या गोष्टी अचानक होणाऱ्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आयसीएमआरच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

दारूच्या थेंबास कधीही न शिवलेल्या व्यक्तीपेक्षा दारूचे नेहमी सेवन करणाऱ्या व्यक्तीतील अचानक होणाऱ्या मृत्यूची शक्यता अधिक असल्याचे या अभ्यासाने स्पष्ट केले आहे. कोरोना महासाथीनंतर तरुण व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसले होते. या मृत्यूंच्या कारणांबाबत संभ्रम असे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe