Water Storage : देशभरात पाण्याचं संकट ! प्रमुख जलाशयांमध्ये अवघा ३८ टक्के पाणीसाठा

Ahmednagarlive24 office
Published:
Water Storage

Water Storage : उन्हाळ्याची अद्याप सुरुवातच असताना देशातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा पाणीसाठा गेल्या दशकातील या कालावधीमधील सरासरीपेक्षा खूप कमी असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमधील जलसाठ्यात घट झाल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

देशातील १५० प्रमुख जलाशयांतील जलसाठ्याची क्षमता १७८.७८४ अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे. राष्ट्रीय पातळीवर जलसाठ्याची क्षमता २५७.८१२ बीसीएम असून, त्या तुलनेत प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठ्यांची क्षमता ६९.३५ टक्के आहे.

सध्या या धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ६७.५९१ बीसीएम असून, एकूण साठवण क्षमतेच्या ३८ टक्के आहे. गतवर्षी या धरणांमध्ये जिवंत पाणीसाठा ८०.५५७ बीसीएम होता. गत दशकात ही सरासरी ७२.३९६ बीसीएम असल्याचे जल आयोगाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

बंगळुरूसारख्या शहरांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या शहराला दरदिवशी ५०० कोटी लिटर (एमएलडी) पाणी कमी पडत आहे. या शहराला २,६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना ही टंचाई निर्माण झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये गतवर्षी पाणीपातळीत कमी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक माहितीपत्रात दिली आहे.

बंगळुरू शहरात एकूण १४ हजार बोअरवेल असून, त्यापैकी ६, ९०० बोअरवेल आटले आहेत. येथील जलस्रोत एक तर आटले आहेत किंवा त्यांच्यावर अतिक्रमण झाले आहे. बंगळुरू शहराला २,६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता असून,

त्यापैकी १,४७० एमएलडी पाण्याची गरज कावेरी नदीतून, तर ६५० एमएलडी पाण्याची गरज बोअरवेलद्वारे भागवली जात असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe