पाणीटंचाईचे संकट… चितळी परिसरात भूजल पातळी खालावली !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : सत्ततच्या अल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पिण्याच्या पाण्याचा व पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी व पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे.

यासाठी बोअरची संख्या वाढत आहे; मात्र काही वर्षांपूर्वी अवघ्या १०० ते १५० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ४०० फुटांवरदेखील लागत नसल्याने, भविष्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर झाली आहे.

पावसात्त्या पाण्याचे पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नाही. परिणामी, भूजल पातळी कमी होत चालली आहे. पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्‌या प्रमाणात बोअरवेल, विहिरी खोदल्या जात आहेत. प्रत्येक गावात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे.

जमिनीतून पाणी मिळेल या आशेने नागरिक बोअरवेल खोदत आहेत; मात्र पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ४०० फूट खोल बोअरवेलसाठी वीस हजार ते पंचवीस हजार रुपये खर्च होत आहेत. पूर्वी १०० ते १५० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये बोअरवेलचा व्यवसायला मागणी वाढत आहे.

पाणीपातळी खालावत चालली असल्याने जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी तालुकास्तरीय धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. शाखीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल.

रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प प्रत्येक भागात राबवून त्याची जनजागृती भविष्यात करावी लागणार आहे.

आजमितीस शेतीच्या व पशुधनांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाण्याची ही गरज भागवण्यासाठी विहीर व बोअरवेल खोदण्यासाठी लाखो रुपये शेतकरी खर्च करत आहेत.

कूपनलिकांवर हजारो रुपये खर्च

विहिरीतील पाण्याची पातळी अचानक घटल्याने व शेतात उभा असलेल्या भाजीपाला वाचवण्यासाठी एका महिन्यात तीन बोअरवेल घेतले. त्यासाठी हजारो रुपये केलेला खर्च वाया गेला. पावसाचे पडलेले पाणी वाहून जात असल्याने रेन वाटर हार्वेस्टिंगसाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. – महेंद्र भोसले, तरुण शेतकरी

बोअरवेलची मागणी वाढणार

आजमितीला मागणी कमी-अधिक असली तरी, अजून १० ते १२ दिवसांनी उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून त्यामुळे पाण्याचे संकट जसे तीव्र होईल, त्या प्रमाणात बोअरवेल मारण्यासाठी मागणी वाढणार आहे; मात्र मागील वर्षीपेक्षा चालू वर्षी बोअरवेलचा दर कमी झालेला आहे. – विष्णू वाघ, बोअरवेल व्यवसायिक

पाणाड्यांना मागणी वाढली

पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे बोअरवेलची जागा निश्चित करण्यासाठी परिसरातील जमिनीतील पाणी शोधणारे पाणाडे येऊन पाण्याचे ठिकाण, जागा सांगत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार नागरिक हजारो रुपये खर्च करून बोअरवेल खोदत आहेत.

पाणी असलेली जागा दाखविण्याची पाणाडे नारळ, लाकडी काठ्या, तवा फिरवून व विविध प्रकारच्या झाडांचा अंदाज घेत, पाणी सांगत आहेत; मात्र भूगर्भात पाणी नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe