Maharashtra News : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. शेवगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
शेवगाव, पाथर्डीसह ४७ गावांना प्रादेशिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु या योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे शेवगाव शहरासह ग्रामीण भागात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. मंगरुळ बु., मंगरुळ खुर्द, कोळगाव, हसनापूर, ठाकुर निमगाव आदी गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, जल वाहिन्यांमध्ये बिघाड होणे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात अपुऱ्या क्षमतेच्या टाक्या, यामुळे पाणीपुरवठा अपुरा व कमीक्षमतेने होत आहे,
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच विहिरींनी तळ गाठल्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा मुकाबला येथील नागरिकांना करावा लागत आहे. किमान पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
शेवगावसह परिसरातील गावांना जायकवाडी धरणामुळे मोठा फायदा जरी होत असला तरी तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, लाडजळगाव, चापडगाव, बेलगाव, अंतरवाली, राणेगाव, मंगरुळ, कोळगाव, वरखेड, ठा. निमगाव परिसर पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे या भागात पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून, अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा मुकाबला या परिसरातील नागरिकांना करावा लागत असल्यामुळे सागर उशाला आणि कोरड घशाला, आशी अवस्था शेवगावकरांची झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पाणीपट्टी नियमित; शुद्ध पाणी सुरळीत’ जाहिरात फक्त नावाला
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची लाखो रुपये खर्च करून जाहिरात केली जात आहे; परंतू ऐन पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयांच्या भिंतीवर जाहिरात लावून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पाणीपट्टी नियमित भरूनदेखील पाणी मिळत नसल्यामुळे या योजनेच्या कारभाराविषयी नाराजी दिसून येत आहे.