एक काळ होता की लग्न म्हटलं की मुलाकडच्या मंडळींचा थाटमाट असायचा. मुलाला पाहिजे ते देण्याची तयारी असायची कारण मुलीचे लग्न होणे तिचे कल्याण होणे गरजेचे असायचे असे मुलींकडील मंडळी मानत असे.
परंतु आता काळाच्या ओघात मुलींचा जन्मदर घटला. तसेच मुलांनाही रोजगार, नोकरी लवकर मिळेनाशी झाली. त्यामुळे अनेकांनी आता वयाची तिशी ओलांडली आहे तरी लग्नासाठी मुलीचं भेटेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या मुलांची व त्यांच्या नातलगांची अवस्था ‘हुंडा नको फक्त पोरगी द्या मला’ अशी झालीये.
हुंड्यासाठी अडून बसणारे वरपिता आणि रंगरूपावरून अडून बसणारे नवरदेव हे चित्र आता बदलले असून, आता मुलीच मनपसंत जोडीदार मिळेपर्यंत नकार देताना दिसून येत आहेत. शिक्षणाची संधी मिळाल्यानंतर मुलींनी आपली हुशारी सिद्ध केली आहे.
दहावी, बारावीच्या निकालात तर मुलांपेक्षा मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. यावरून मुलांपेक्षा मुलीच हुशार असा दावा केला तर चुकीचा ठरणार नाही.
त्यातूनच तरुणींच्या अपेक्षा शेतकरी कुटुंबातील तरुणांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. मुलींच्या कमी संख्येमुळे वरपित्यांना वधूपित्यांच्या मागे धावावे लागत आहे.
नोकरीवाला नवरा पाहिजे..
बहुतेक तरुणींकडून नोकरी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात आहे. नोकरी मिळत नसल्याने बहुतांशी तरुण शेती व उद्योग, व्यवसाय करतात.
मुलींकडून मात्र नोकरीवाला नवरा पाहिजे, असा हट् धरला जात असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विचित्र परिस्थितीमुळे त्यातूनच हुंड्याचा आग्रह कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे
तिशी ओलांडली तरी मुलगी भेटेना
विविध कारणांमुळे अनेक तरुणांनी वयाची ३० वर्षे झाली तरी लग्न केलेले नाही. वधू – वर मेळाव्यातही ९० टक्के मुलांचीच नोंदणी होते. यात मुलींची संख्या अत्यल्प असते. यामुळे विवाह जुळत नसल्याने तरुण चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
मुलींच्या अपेक्षा व मुलांच्या अडचणी
सर्वसामान्य मुलांचे लग्न न जमण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मुलांपेक्षा मुली जास्त शिकलेल्या असून मुलींच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. ही अडचण भविष्यात देखील जास्त वाढून मुलाकनही अडचण ठरू शकते असे म्हटले जात आहे.