विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट आणला पण आता मात्र या नेत्‍यांना त्‍याचा सोसोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला माजी कृषी व पणन मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा असे आवाहनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले. राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आ.विखे पाटील यांच्या हस्ते क्रॉक्रीटीकरणाचा आणि डाळींब सेल हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, व्हा.चेअरमन प्रतापराव जगताप, सभापती बापूसाहेब आहेर, नगराध्यक्षा श्रीमती अर्चना कोते सभापती सौ.नंदाताई तांबे, अॅड.रघूनाथ बोठे, वाल्मिकीराव गोर्डे, ज्ञानेश्वर गोंदकर, अशोकराव जमधडे,

सहाय्यक निंबधक जितेंद्र शेळके, कृषि अधिकारी शिंदे आदी याप्रसंगी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नविन कृषी धोरणाचे स्वागत करुन आ.विखे पाटील म्हणाले की, या धोरणांमुळे कृषी व्यवसायाला स्वातंत्र्य मिळाले आहे.

मुक्त अर्थव्यवस्थे मध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टीचा समावेश या धोरणात असल्याने कृषी व्यवसायात अमूलाग्र बदलांच्या क्रांतीची सुरूवात झाली असल्याचे स्पष्ट करून देशातील विरोधक केवळ आपल्या अस्तित्वासाठी या विधेयकाचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रात डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच या देशात मॉडेल अॅक्ट आणला गेला. त्‍यावेळी कृषि मंत्री कोण होते हे सर्वांनाच माहीत आहे. राज्यातही कॉग्रेस आघाडीचे सरकार असताना वायदे बाजार, ऑनलाईन ट्रेनिंग,आणि खासगी बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी दिली पण याचा सोयीस्कर विसर आता कॉग्रेंस नेत्यांना कसा पडलाॽ

असा सवाल उपस्थित करून आ.विखे पाटील म्हणाले की, विधेयकाला विरोध करताना सभागृहात कोणाची भूमिका काय होती हे संपूर्ण देशाने पाहीले असल्याकडे लक्ष वेधून राज्यात सतेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकप्रकारे विधेयकाला समर्थनच देवून कॉग्रेसला तोंडावर पाडले असल्याची टिका त्यांनी केली.

करोना संकटाच्या काळात राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला असताना सुध्दा राज्य सरकारने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली नाही.उत्पादीत माल फेकून द्यावा लागला.शासनाने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती.परंतू निर्णय करणारेच घरात बसले.

अधिका-यांच्या बदल्या करण्यात जेवढी तत्परता दाखवली तेवढी शेतकऱ्यांसाठी का दाखवली नाही. बाजार समित्या बंद ठेवणारेच आज शेतकऱ्यांच्या खोट्या प्रेमाचा पुळका दाखवित असल्याचे ते म्‍हणाले. केद्र सरकारच्या नव्या कृषि धोरणात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहाणार असून

यामध्यमातून स्पर्धा निर्माण होईल योग्य भाव आणि पारदर्शक कारभारातून शेतकऱ्यांना आकर्षित करणारी व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन करतानाच राहाता बाजार समितीने लॉकडाऊनच्या काळातही आपले व्यवहार सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल

आ.विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कर्मचार्याचे अभिनंदन करून,या बाजार समितीने राज्यात आपले वेगळेपण अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सभापती बापूसाहेब आहेर, सचिव उध्दव देवकर यांची भाषण झाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment