अहमदनगर नगर बीड परळी उस्मानाबाद सह मराठवाड्याचे भाग्य उजळविण्यासाठी आपल्या मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. प्रत्यक्षात हि रेल्वे आष्टी ते नगर ते दौंड कॉडलाईन ते पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती.
मात्र आपल्या खात्याचे अधिकारी आपणास खोटी माहिती देत असल्या कारणाने आणि आपल्या नगर स्थित रेल्वे कर्मचाऱ्याचे ड्युटीचे तास पूर्ण व्हावेत आणि त्यांना परत नगर मुक्कामी येता यावे या माफक उद्देशाने आपल्या अधिकाऱ्यांनी हि रेल्वे सकाळी नगरहून आष्टीला सोडली आणि ती दुपारी २ पर्यंत परत नगरला आणली. असे निवेदन अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री यांना युवासेचे राज्य सहसचिव, विक्रम अनिल भैय्या राठोड यांनी पाठवले असून त्याची प्रत पाठपुराव्यासाठी खा निलेश लंके याना दिली.
निवेदनात पुढे म्हणाले आहे कि आता याची दुसरी फेरी दुपारी परत नगरहून आष्टी कडे सोडण्यात येणार आहे. आणि सायंकाळी आष्टीहून निघून ती नगरला आणण्यात येणार आहे. पण या रेल्वेला प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरीदेखील या फ्लॉप शो चा रिपीट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वे खाते का घालत आहे. याचा उलगडा आम्हाला होत नाही.
हि रेल्वे चालविण्यासाठी दररोज ८० हजार रुपयांचे डिझेल लागते पण तिकिटे फक्त १०० ते १५० विकली जातात. मग हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? हि रेल्वे जर आष्टी नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली आणि ती जर सायंकाळी आष्टीहून निघाली आणि पहाटे मुंबईत पोहोचली तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. आज हजारो विद्यार्थी आणि कामगार वर्ग यांना दररोज जास्त वेळ, पैसा आणि परिश्रम खर्च करून रस्ते मार्गाने खस्ता खात पुणे-मुंबई ला जातो आहे.
बीड, आष्टी जामखेड आणि नगरहून पुण्याला दिवसाला लाखाहून अधिक लोक ये-जा करीत असतात. नगर पुणे रोडवरील सुपा टोल नाक्यावर याची नोंद आहे. तसेच नगर पुणे मार्गावर दररोज २००० पेक्षा जास्त एस टी आणि खाजगी ट्रॅव्हल्स ची वाहतूक होते.
त्यामुळे आष्टी नगर-दौंड क्कडलाईन-पुणे-मुंबई अशी थेट रेल्वे सुरू झाल्यास सर्वांची सोय तर होईलच, पण विकासास नवा आयाम मिळेल. हि रेल्वे सुरु करण्याबरोबरच मनमाड नगर पुणे रेल्वे मार्गावर ज्या एक्स्प्रेस आणि पेसेंजर रेल्वे गाड्या धावतात त्यांना नगर स्थानकातून पुण्यासाठी तिकीट मिळावे यामुळे लाखो लोकांचे नशीब बदलेल. आणि त्याच्या प्रगतीत भर पडेल.
नगरमधील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. थेट रेल्वे सुरू झाल्यास दीड तासात ते पुण्याला पोहोचू शकतील आणि आपल्या घरी राहूनच शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. रेल्वेअभावी प्रवाशांच्या वेळ व खिशाला चाट बसत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी थेट रेल्वे हाच एक पर्याय आहे.
नगर पुणे रेल्वे मार्गावर कॉड लाईन टाकण्यात आल्याने आणि या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाल्यामुळे नगर पुणे हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासावर आला आहे. उलट वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नगर पुणे हा रस्ता मार्गे प्रवास ४ ते साडेचार तासांचा झाला आहे. हा एक वेगळा मनस्ताप आहे.
आष्टी नगर-दौंड क्ाडलाईन- पुणे-मुंबई अशी रेल्वे सुरू करण्यात आली तर रेल्वे व प्रवासी अशा दोघांच्याही दृष्टीने फायद्याच ठरेल. मराठवाड्यातील प्रवासीही नगरपर्यंत बसने येऊन येथून रेल्वेने लवकर पुणे मुंबईला जाऊ शकतील. त्यामुळे लवकरात लवकर आष्टी नगर-दौंड क्कडलाईन-पुणे-मुंबई रेल्वे चालू करावी हि नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे.