8th Pay Commission : लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून देशात आठवा वेतन आयोगाची चर्चा आहे. या चर्चेचे कारण असे की, सध्याचा सातवा वेतन आयोग लागू होऊन आता दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. यामुळे नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास हेच सांगतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता. यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग बहाल केला आहे. यानुसार आत्तापर्यंत सात वेतन आयोगाची भेट मिळाली आहे.
सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू असून आजही सुरु आहे. खरे तर सध्याच्या वेतन आयोगाची स्थापना ही फेब्रुवारी 2014 मध्ये करण्यात आली होती. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या वेतन आयोगाची स्थापना केली.
वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर याचा अहवाल हा 2016 मध्ये सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी मनमोहन सिंग सरकार पायउतार झाले होते आणि नवीन मोदी सरकार सत्तेवर आले होते. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांच्या काळात म्हणजेच 2016 मध्ये 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे.
दरम्यान, आता एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. परंतु याच्या समितीची स्थापना ही 2024 अखेरपर्यंत होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही महिन्यांपासून आठवा वेतन आयोगाची मागणी जोर धरू लागली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. सरकारला यासाठी निवेदने दिली जात आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मधील समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी आठवा वेतन आयोगाबाबत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार भदोरिया यांनी जुनमध्ये 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारला विविध क्षेत्रांकडून निवेदन प्राप्त झाले आहे का ? असल्यास त्याचा तपशिल आणि त्यावर केलेली कार्यवाही, तसेच देशातील अभूतपुर्व महागाई लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकार आठवा वेतन केंद्रीय वेतन आयोग कधीपर्यंत स्थापन करेल ? असा अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
यावर सरकारकडून काही मोजक्याच शब्दात उत्तर देण्यात आले आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचे दोन निवेदन सरकारला प्राप्त झाले आहेत.
पण आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सध्या सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाहीये, अशी भूमिका सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे. यावरून आठवा वेतन आयोगासाठी केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.