ST Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या वाहक, चालक आणि वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्येही या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर संप पुकारला होता. यंदाही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा यासाठी पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.
कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला असून या संपाला राज्यभरातूनच चांगला प्रतिसादही मिळतोय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. यामुळे राज्यातील शिंदे सरकारने या संपावर लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे.
यामुळे आज आम्ही एसटी कर्मचारी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी का करत आहेत? एसटी कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेमका किती फरक आहे? याच संदर्भात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसटी अन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील फरक?
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आणि शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या वाहनचालकांना एकसमान दर्जा देण्यात आलेला नाही. खरे तर शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या वाहनचालकांच्या तुलनेत एसटी महामंडळातील चालकांना वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते.
म्हणजे शासकीय वाहनचालकांनाही तेवढीच काळजी घ्यावी लागते मात्र एसटीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी पाहता आणि एसटी बस अवजड वाहन असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची ड्युटीही आव्हानात्मक आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही.
परंतु आव्हानात्मक काम असतानाही शासकीय वाहन चालकांच्या तुलनेत एसटी महामंडळातील वाहनचालकांना फारच कमी मानधन दिले जाते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेचं एसटी कर्मचाऱ्यांनाही पगार दिला गेला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शासकीय वाहन चालकाला 50 ते 55 हजार रुपये पगार असतो. शिवाय या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्ते सुद्धा दिले जात आहेत. म्हणजेच पगार आणि वेगवेगळे भत्ते मिळून शासकीय वाहनचालकाला महिन्याला सुमारे 75 हजार रुपये मिळतात.
दुसरीकडे, ज्या एसटी महामंडळातील वाहनचालकाच्या खांद्यावर अनेक प्रवाशांची जबाबदारी असते त्या बस चालकाला पगार म्हणून फक्त 24 हजार रूपये मिळतात. आता या महागाईच्या काळात एवढ्याशा पगारावर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.
एवढ्याशा पगारात कुटुंबाचे पोट, राहण्याचा खर्च आणि मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या याच प्रश्नात एसटी महामंडळातील ड्रायव्हर तथा कंडक्टर लोक मानसिक तणावात आले आहेत. सेवेत असताना कमी पगार तर असतोचं शिवाय सेवा संपल्यानंतरही एसटी बस चालकाला अपेक्षित पेन्शन मिळत नाही.
यामुळे एसटी बसचालकाची आयुष्याची संध्याकाळ देखील आर्थिक चणचणीतचं जाते. शासकीय चालकाला शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळते. पण, सध्या सेवानिवृत्त झालेल्या एसटी बस चालकाला फक्त 4 हजार रुपये पेन्शन दिले जात आहे. तसेच जे फार आधीच रिटायर्ड झाले आहेत त्या जुन्या रिटायर्ड एसटी बस चालकांना अवघा एक किंवा 2 हजार रुपये पेन्शन मिळतं आहे.
शासकीय वाहनचालकांचा आणि एसटी बस चालकाचा पगार पाहिला असता दोघांच्या पगारात जमीन-आसमानाचा फरक दिसून येत आहे. हेच कारण आहे की एसटी कर्मचारी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगाराची मागणी करत आहेत.