Women Government Scheme : शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा हाती घेण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी जे सरकार सत्तेत येते ते नेहमीच प्रयत्न करताना दिसते. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आणि राज्यात नुकत्याच सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सुद्धा महिलांसाठी शेकडो योजना सुरू केल्या आहेत. केंद्रातील सरकारने महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना देखील सुरू केली आहे.
ही योजना गरोदर महिलांसाठी असून या अंतर्गत गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना आर्थिक लाभ पुरवला जात आहे. गरोदर महिलांना गरोदर काळात आपल्या आरोग्याची काळजी घेता यावी, चांगला पोषण आहार खरेदी करता यावा आणि स्तनदा मातांना आपली व आपल्या नवजात बालकाची काळजी घेता यावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
विकसनशील भारत वेगाने विकसित होत आहे मात्र आपल्या देशात कुपोषणाची समस्या आजही कायम आहे. कुपोषणाची समस्या ही गरोदर मातांना व्यवस्थित आहार मिळत नसल्याने वाढत आहे.
हेच कारण आहे की कुपोषणाची समस्या दूर व्हावी या अनुषंगाने केंद्रातील सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली असून या अंतर्गत गरोदर मातांना 6000 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे. महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून ही योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली आहे.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. पहिल्यावेळी गरोदर असल्यास गरोदर आणि स्तनदा मातांना तीन टप्प्यात पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी गरोदर असल्यास तीन टप्प्यात 6000 रुपयाची रक्कम दिली जाते.
कसे मिळते अनुदान
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान हे एकाचवेळी मिळत नाही. हे अनुदान तीन टप्प्यात मिळते. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात गर्भधारणेला ६ महिने झाले की २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात प्रसुतीनंतर बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर २ हजार रुपये मिळतात.
कोणत्या महिलांना लाभ मिळतो?
भारतातील रहिवासी असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला याच्या लाभासाठी पात्र ठरतात. 40 टक्के अपंग असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो. ई श्रम कार्ड असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो.
ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना याचा लाभ मिळत नाही. तसेच खाजगी नोकरीत कायमस्वरूपी कामाला असणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ दिला जाऊ शकत नाही. याचा लाभ फक्त 19 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या गरोदर मातांना मिळतो.
अर्ज कुठे करावा लागणार
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy या वेबसाईटवर जाऊन पात्र गरोदर मातांना आपला अर्ज सादर करता येऊ शकतो. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देखील महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
कोण कोणती कागदपत्रे लागतात?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर मातांना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता मात्र करावी लागते. आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.