देशातील एक नंबरचा धबधबा : विकासाच्या प्रतीक्षेत, स्थानिक संतापले

Mahesh Waghmare
Published:

साताऱ्यातील भांबवली-वजराई धबधबा, देशातील एक नंबरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध असला तरी, आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. २०१८ साली ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही धबधब्याच्या विकासासाठी कोणताही ठोस प्रयत्न झालेला नाही. परिणामी, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.

सोयींचा अभाव
पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा रस्ता जंगलातून चालत पार करावा लागतो. मात्र, रस्ता व्यवस्थित नाही, दगडी पायवाट नाही, आणि पिण्याच्या पाण्यासह बसण्याच्या बेंचेसचीही सोय नाही. जंगलात शौचालयाची सुविधा नाही, आणि सोलर लाइटसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. या अडचणींमुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

पर्यटन विकासाला झटका
इको-टुरिझम बोर्डाने जून २०२३ मध्ये झुलता पूल, दगडी पायवाट, गॅलरी आणि निसर्ग गार्डनसाठी ३ कोटी रुपयांची कामे मंजूर केली होती. मात्र, दीड वर्ष उलटूनही उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांनी संबंधित कामांचा आराखडा मंत्रालयात सादर केलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, भारद्वाज यांना स्थानिक समस्यांची पूर्ण जाणीव नसल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी जोर धरत आहे.

स्थानिकांची अपेक्षा
साताऱ्याला प्रथमच पर्यटन खाते मिळाल्यामुळे, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पर्यटक आणि ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे धबधब्याच्या विकासासाठी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. स्थानिकांसाठी मुलभूत सुविधांसह दीर्घकालीन पर्यटन विकासाचे नियोजन करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

दुर्लक्षाची परंपरा थांबेल का?
देशातील एक नंबरचा धबधबा असलेल्या भांबवली-वजराईला अद्याप आवश्यक त्या सोयी उपलब्ध झालेल्या नाहीत. पर्यटनप्रेमी आणि स्थानिकांचे प्रश्न कायम आहेत

धबधब्याचा विकास होईल का ?
पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होतील का? साताऱ्याच्या निसर्ग पर्यटनाचा डंका देशभर वाजेल का? ग्रामस्थ आणि पर्यटनप्रेमींच्या अपेक्षा लक्षात घेऊन, नव्या मंत्र्यांनी यावर ठोस पावले उचलणे अत्यावश्यक ठरले आहे. भांबवली-वजराई धबधब्याचा विकास केल्यास साताऱ्याला नवा ओळख मिळण्याबरोबरच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला चालना
साताऱ्याला निसर्गसंपदा लाभलेली असताना, योग्य नियोजनाने भांबवली-वजराई धबधब्याचा विकास केला तर पर्यटन व्यवसाय फुलणार आहे.
बारमाही पर्यटन केंद्र: धबधब्याचा विकास झाल्यास साताऱ्याला पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख मिळू शकते.
स्थानिक रोजगार: हॉटेल व्यवसाय, गाईड सेवा, आणि पर्यटनाशी निगडित इतर उद्योगांना चालना मिळेल.
शहराकडील विस्थापन थांबेल: स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास त्यांना शहरात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe