Gold price : भारतीय अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2024 या वर्षात सोन्याचे दर विक्रमी 20.22% ने वधारले असून, सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,000 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. 2025 साल उजाडताच फेब्रुवारी महिन्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोन्याच्या किंमती 92,000 रुपयांवर (GST सह) पोहोचल्या आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या दोन दशकांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2005 साली फक्त 7,000 रुपये प्रतितोळा असलेले सोने, 2025 साली तब्बल 90,000 रुपयांवर पोहोचले आहे.

2005 मध्ये सोन्याचा दर फक्त ₹7,000 प्रति तोळा होता, तर 2025 मध्ये तो ₹90,000 प्रति तोळ्याच्या घरात पोहोचला आहे. या कालावधीमध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 1185% वाढ झाली आहे.
2005 ते 2010: सोन्याचा स्थिर कालखंड
2005: या वर्षी सोन्याचा दर ₹7,000 प्रति तोळा होता. त्यावेळी भारतात सोन्यात गुंतवणूक करण्याकडे मर्यादित प्रमाणात लोकांचा कल होता. मात्र, परंपरेप्रमाणे सोन्याचा उपयोग दागिन्यांमध्ये जास्त केला जात होता.
2006: भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती आणि सोन्याची किंमत ₹8,400 प्रति तोळा झाली. गुंतवणूकदारांना सोन्याचा परतावा चांगला मिळत असल्याने सोन्यातील मागणी वाढली.
2007: शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पर्यायी सुरक्षित गुंतवणूक मानले गेले. त्यामुळे सोन्याचा दर वाढून ₹10,800 प्रति तोळा झाला.
2008: या वर्षी जागतिक आर्थिक मंदी सुरू झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवले, परिणामी किंमत ₹12,500 प्रति तोळा झाली.
2009: अर्थव्यवस्था मंदीतून सावरत असतानाच सोन्याची किंमत पुन्हा वाढली आणि ती ₹14,500 प्रति तोळा झाली.
2010: भारतात आर्थिक विकासाच्या गतीमुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी, सोन्याचा दर ₹18,500 प्रति तोळा झाला.
2011 ते 2015: मोठी तेजी आणि घसरण
2011: या वर्षात सोन्याने मोठी उसळी घेतली आणि किंमत ₹26,400 प्रति तोळा झाली. जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता आणि चलनवाढीच्या भीतीमुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली.
2012: सोन्याच्या किंमतीतील वाढीचा प्रवास सुरूच राहिला आणि दर ₹31,500 प्रति तोळा पर्यंत पोहोचला.
2013: मात्र, जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू स्थिर होऊ लागल्याने सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली. त्यामुळे किंमत ₹29,600 प्रति तोळा झाली.
2014: नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थिरतेच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या किंमतीत मोठे बदल झाले नाहीत. किंमत ₹28,006 प्रति तोळा होती.
2015: सोन्याच्या किमतीत आणखी घसरण झाली आणि किंमत ₹26,343 प्रति तोळा झाली. शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला.
2016 ते 2020: सोन्याच्या किंमतीत पुन्हा उसळी
2016: जागतिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ लागली. किंमत ₹28,623 प्रति तोळा झाली.
2017: भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत काहीशी स्थिरता होती. दर ₹29,667 प्रति तोळा होता.
2018: सोन्याचा दर ₹31,438 प्रति तोळा झाला, कारण जागतिक स्तरावर चलनवाढ आणि आर्थिक अनिश्चितता वाढू लागली.
2019: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सोन्याचा दर झपाट्याने वाढला आणि ₹35,220 प्रति तोळा झाला.
2020: कोविड-19 महामारीच्या काळात जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. परिणामी, सोन्याचा दर विक्रमी ₹48,651 प्रति तोळा झाला.
2021 ते 2025: विक्रमी उच्चांक
2021: कोविडमधून अर्थव्यवस्था सावरत असताना, सोन्याचा दर ₹48,720 प्रति तोळा होता.
2022: महागाई वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आणि दर ₹52,670 प्रति तोळा झाला.
2023: भारत आणि जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने किंमत ₹65,330 प्रति तोळा झाली.
2024: जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतीत तब्बल 10,000 रुपयांची वाढ झाली आणि दर ₹77,913 प्रति तोळा पर्यंत पोहोचला.
2025: फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि ₹90,000 प्रति तोळा झाला. जीएसटी धरल्यास हा दर ₹92,000 प्रति तोळा गेला आहे.
सोन्यात गुंतवणूक – सर्वात सुरक्षित पर्याय आहे ?
1) सोन्यात सुरक्षितता
शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे आणि परिणामी, सोन्याच्या गुंतवणुकीला प्रचंड मागणी वाढली आहे. आर्थिक मंदी, महागाई, आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे सोन्याच्या किमती अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
2) सोन्याची मागणी वाढली
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या महागाईचा प्रभाव आहे. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-चीन व्यापार तणाव, मध्यपूर्वेतील संघर्ष, आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत. इतिहास साक्षी आहे की, अशा अस्थिर काळात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानतात.
3) रुपयाची घसरण आणि डॉलर
भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सतत घसरत आहे. परिणामी, सोन्याच्या किंमती भारतीय बाजारात वाढत आहेत. डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमती आणखी चढू शकतात.
4) महागाईच्या दरात वाढ
महागाईच्या काळात गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर वाटते. सोने हे ‘हॅज अगेन्स्ट इन्फ्लेशन’ मानले जाते, म्हणजेच महागाई वाढल्यावर सोन्याची किंमतही वाढते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे ही सुरक्षित आणि दीर्घकालीन फायद्याची निवड ठरू शकते.
2025 मध्ये गुंतवणूक करावी का ?
सध्याच्या घडीला सोन्याच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ मानला जात आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ETF, गोल्ड बोंड्स आणि डिजिटल गोल्ड हे पर्याय उपलब्ध आहेत. भौतिक स्वरूपात सोन्याची खरेदी करणे हा पारंपरिक पर्याय असला, तरी डिजिटल आणि पेपर गोल्ड सुरक्षित आणि सहज लिक्विडिटी असलेले पर्याय मानले जातात.
सोन्याची किंमत आणखी वाढणार?
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातील परिस्थिती पाहता सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत सोन्याचा दर 95,000 ते 1,00,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो.