एप्रिलमध्ये कर्ज स्वस्ताईचे संकेत : महागाईची धग कमी झाल्याने व्याजदर कपातीची शक्यता

Published on -

१५ मार्च २०२५ नवी दिल्ली : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण आढावा धोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर झालेल्या किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या स्वीकारार्ह लक्ष्यापेक्षा कमी झाली आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने १२ मार्च रोजी किरकोळ महागाई दराचे आकडे जाहीर केले, त्यानुसार किरकोळ महागाई जानेवारीतील जानेवारीतील ४.३ टक्क्यांवरून फेब्रुवारी महिन्यात ३.६१ टक्क्यांवर आली आहे. महागाई नरमल्यामुळे आता व्याजदर कपात होऊन एप्रिलमध्ये स्वस्त कर्जाचे संकेत मिळू लागले आहेत.

रिझर्व्ह बँकेने रेपो दर कपातीचे चक्र आधीच सुरू केले आहे आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत ते दरात २५ बेसिस पॉइंट्सची
कपात करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रेपो दर ६ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे एचएसबीसी रिसर्चने अहवालात म्हटले आहे.

सध्या, मार्च तिमाहीतील महागाई दर या तिमाहीसाठी मध्यवर्ती बँकेच्या अंदाजापेक्षा कमी आहे. तसेच, हिवाळी पिकांची पेरणी चांगली झाल्याने पुढील काही आठवड्यांतील तापमान महत्त्वाचे आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, ७ ते ९ एप्रिल दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली नाणेनिधी विषयक धोरण समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत महागड्या ईएमआयमुळे त्रस्त असलेल्या लोकांना पुन्हा एकदा दिलासा मिळू शकतो. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने रेपोदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के केला होता आणि आता नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात नाणेनिधी धोरण समितीच्या बैठकीत किरकोळ महागाई दरातील मोठ्या घसरणीची दखल घेत रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता आहे.

ग्राहक किमतीवर आधारित महागाई ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे हे घडले आहे. अन्नधान्य महागाई नियंत्रित करूनच अर्थव्यवस्थेतील वापराला चालना मिळू शकते. किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांच्या जवळपास असणे धोरणात्मक दृष्टिकोनातून चांगले आहे कारण त्यामुळे एप्रिलमध्ये दर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेने नाणेनिधी धोरणाची घोषणा करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये महागाई दर सहनशीलतेच्या पातळीच्यावर गेल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घट दिसून आली, असे म्हटले होते.

येत्या काळात,पुरवठ्याच्या बाजूने कोणताही धक्का न लावता खरीप पिकांचे चांगले उत्पादन, हिवाळ्यात भाज्यांच्या किमतीत घट आणि रब्बी पीक चांगले येण्याची शक्यता यामुळे अन्नधान्य महागाईचा दबाव कमी होऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये महागाई दर ४.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे, तर चौथ्या तिमाहीत महागाई दर ४.४ टक्के राहू शकतो. याच विचार करता कर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!