गेल्या काही दिवसांपासून भारत- पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने अगाध पराक्रम दाखवला. अशाच पराक्रमाच्या गोष्टी सुरु असताना जपानच्या एका सैनिकाचा उल्लेख करावासा वाटतो. या सैनिकाने आपल्या देशाचा पराभव झाल्यानंतरही तब्बल 29 वर्षे देशाच्या दुश्मनांशी एकट्याने युद्ध केले.
कोण होता हा सैनिक?
दुसरे महायुद्ध सुरु होते. 26 डिसेंबर 1944 रोजी इंपीरियल जपानी आर्मीचे सेकंड लेफ्टनंट हिरू ओनिडा यांना फिलीपिन्समधील लुबांग या छोट्या बेटावर पाठवण्यात आले. त्याना अमेरिकन सैन्याशी युद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. अमेरिकन सैन्याने फेब्रुवारी 1945 मध्ये अवघ्या दोन महिन्यांत लुबांग बेट ताब्यात घेतले. या युद्धात अनेक जपानी सैनिक मारले गेले. या कठीण परिस्थितीतही सेकंड लेफ्टनंट हिरू ओनिडा आणि त्यांचे तीन साथीदार जंगलात लपून राहिले.

29 वर्षे केले युद्ध
हिरु ओनीडा व त्यांच्या तीन साथिदारांनी त्यानंतर गोरिल्ला युद्ध सुरु ठेवले. त्याच वर्षी ऑगस्ट 1945 मध्ये अमेरिकेने रागाच्या भरात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला केला. जपानला शरणागती पत्करावी लागली. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा झाली. हे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेने फिलीपिन्सच्या जंगलात हजारो पत्रके टाकली. हिरू ओनिडालाही ही पत्रे सापडली. परंतु आपल्या देशाने आदेश दिला नाही, असे समजून ओनिडा यानी आपले युद्ध सुरुच ठेवले. ते 29 वर्षे जंगलात लपून युद्ध करत राहिले.
जपाननेच काढले शोधून
युद्ध हरल्यानंतर सुमारे 25 वर्षांनी ओनिडाचे सर्व साथीदार मरण पावले. परंतु त्याने एकट्याने युद्ध सुरु ठेवले. अखेर जपानच्या नोरियो सुझुकीने फिलीपिन्सच्या जंगलात शोध मोहीम राबवली आणि हिरू ओनिडाला शोधून काढले. परंतु तरीही ओनिडाने युद्ध थांबविण्यास नकार दिला. अखेर जपानमधील त्याच्या कमांडरला जो आता निवृत्त झाला होता, त्याला जपानने फिलीपिन्सच्या जंगलात पाठवले. त्याच्या आदेशाचे पालन करून हिरू ओनिडाने फिलीपिन्सला शरणागती पत्करली. फिलीपिन्स सरकारने त्याला युद्ध नियमांनुसार माफ केले आणि जपानला परतण्याची परवानगी दिली.