आकर्षक फुले शरीरालाच नाही तर मनालाही शांती देतात. अशा विविध रंगी व विविध सुगंधी फुलांचा स्वर्ग आहे, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’. या व्हॅलीत तुमची नजर जाईल तेथपर्यंत फक्त रंगीबेरंगी फुले दिसतात. विशेष म्हणजे ही व्हॅली वर्षातील फक्त तीन ते चार महिनेच पर्यटकांसाठी खुली असते. तीच व्हॅली यंदा 1 जूनला पर्यटकांना पाहता येणार आहे.
यूनेस्कोलाही पडली भुरळ
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असलेल्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला 2005 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. नैसर्गिक, सुंदर आणि जैविक विविधतेमुळे हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. ही दरी 87.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. जगभरात आढळणाऱ्या 500 हून अधिक प्रजातींच्या फुले येथे आढळतात.

कुणी शोधले हे ठिकाण?
वनस्पतिशास्त्रज्ञ फ्रँक सिडनी स्मिथ कामेट गिर्यारोहणावरून परतत असताना ते वाटेत हरवले. ते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स येथे पोहोचले. फुलांनी सजवलेली ही स्वर्गासारखी दरी पाहून ते मंत्रमुग्ध झाले. 1937 मध्ये फ्रँक एडिनबर्ग येथे तीन महिने राहिले. त्यांनी व्हॅली अँड फ्लॉवर्सवर एक पुस्तकही लिहिले. त्यामुळे संपूर्ण जगाला या व्हॅलीबद्दल माहिती झाली. मनोरंजक गोष्ट म्हणजे दर 15 दिवसांनी तुम्हाला या दरीचा रंग बदलताना दिसतो.
किती प्रजातींची आहेत फुले?
या व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये 500 हून अधिक प्रजातींची फुले पाहायला मिळतात. येथे जैवविविधतेचा खजिना आहे. पोटोटिला, प्रिम्युला, अॅनिमोन, अमोनिटम, ब्लू पापी, मार्स मेरी गोल्ड, फॅन लोटस अशी अनेक प्रकारची फुले येथे वाढतात. येथे बहुतेक फुले ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उमलतात. या दरीत दुर्मिळ प्रजातींचे प्राणी, वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे जग आहे. जून ते ऑक्टोबर या काळात ही दरी उघडी असते.