2025 सालचा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून त्याचे अधिकृत वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही टूर्नामेंट 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल 12 वर्षांनंतर भारत महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचं आयोजन करत आहे. यापूर्वी भारतात 2016 मध्ये महिला टी-20 विश्वचषक आयोजित करण्यात आले होते.
वर्ल्ड कपचे वेळापत्रक
या वर्ल्ड कपचे सामने बेंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत. पण पाकिस्तानचा संघ भारतात खेळणार नाही. त्यांच्या सर्व सामन्यांसाठी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम निवडण्यात आले आहे. ही स्पर्धा राउंड-रॉबिन स्वरूपात होणार असून प्रत्येक संघ इतर सर्व संघांशी एकदा खेळेल. एकूण 28 लीग सामने होतील, त्यानंतर 2 उपांत्य फेरी आणि अंतिम सामना आयोजित केला जाईल.

भारत 30 सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आपला पहिला सामना खेळेल. पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबो येथे होईल, तर दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे होईल. अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू किंवा कोलंबोमध्ये खेळवला जाईल. जर पाकिस्तान उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचला, तरी त्यांचे सामने कोलंबोमध्येच होतील.
‘असे’ असतील संघ-
या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील – भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश. ऑस्ट्रेलिया हा गतविजेता असून आतापर्यंत 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या शेवटच्या विश्वचषकात त्यांनी इंग्लंडला हरवले होते. यंदा भारत घरच्या मैदानावर खेळणार असल्याने महिला संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बीसीसीआय लवकरच भारतीय संघाच्या कर्णधाराची घोषणा करणार आहे.
टी-20 विश्वचषकाची घोषणा –
याशिवाय, आयसीसीने 2026 महिला टी-20 विश्वचषकाची घोषणा देखील केली आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असून 12 जून 2026 पासून सुरुवात होईल. इंग्लंड पहिला सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळेल, तर अंतिम सामना 5 जुलै रोजी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर रंगेल.
एकूण 33 सामने 7 शहरांमध्ये खेळवले जातील – बर्मिंगहॅम, मँचेस्टर, लीड्स, साउथहॅम्प्टन, ब्रिस्टल आणि दोन उपांत्य सामने ओव्हलमध्ये 30 जून व 2 जुलै रोजी होतील. घरच्या मैदानाचा फायदा इंग्लंडला मिळू शकतो, मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडही जेतेपदासाठी जबरदस्त स्पर्धा देतील.