आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विविध देव-देवतांना समर्पित असतो, आणि सोमवार हा विशेषतः भगवान शिवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करून पूजा केली, तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, असा लोकविश्र्वास आहे. पण या पूजेमध्ये काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
सोमवारचे उपाय-

सोमवारी सकाळी लवकर उठून, स्नान करून पवित्र मनाने शिवमंदिर गाठावं. शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करणं ही पूजा सुरू करण्याची पहिली आणि महत्त्वाची कृती असते. शक्य असल्यास तांब्याच्या लहान पात्रातून पाणी हळूहळू शिवलिंगावर वाहावं आणि त्याच वेळी “ॐ नमः शिवाय” हा मंत्र उच्चारत राहावं. या मंत्रजपात जी भक्तीभावना असते, तीच महादेवांना खऱ्या अर्थाने प्रिय असते.
यासोबतच दूध, दही, मध आणि बेलपत्र अर्पण करावं. या गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय मानल्या जातात. बेलपत्रावर तिन्ही नसा स्पष्ट असाव्यात आणि ते स्वच्छ पाण्याने धुतलेले असावं. हे अर्पण करताना तुमच्या मनात कोणतीही द्वेष भावना नसावी, तुम्ही जितक्या निर्मळ भावनेनं ही पूजा कराल, तितकं तिचं फळ तुमच्या आयुष्यात मिळेल.
शिवपूजेत ‘या’ गोष्टी टाळा-
मात्र, शिवपूजेत काही गोष्टी अर्पण करणं टाळावं. तुळशीची पानं, हळद आणि सिंदूर शिवलिंगावर कधीही अर्पण करू नयेत. तुळशी विशेषतः भगवान विष्णूला प्रिय असून ती शिवाला अर्पण करणं वर्ज्य मानलं जातं. हळद आणि सिंदूर या दोन्ही वस्तू स्त्री-शृंगाराशी संबंधित आहेत, आणि त्यामुळे त्या शिवलिंगावर वाहणे अशास्त्रीय आणि अयोग्य मानलं जातं.
पूजेदरम्यान मन शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही वादात अडकणं, राग व्यक्त करणं किंवा नकारात्मक विचार करणं हे या दिवशी विशेषतः टाळावं. महादेव अत्यंत भोळे मानले जातात, पण त्याच वेळी सत्य आणि शांततेचे प्रतीकही आहेत. त्यामुळे भावनेनं आणि भक्तीपूर्ण मनानं पूजा करणं हा खरा मंत्र असतो.
दिशा महत्वाची-
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवलिंगावर काहीही अर्पण करताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे याचीही काळजी घ्या. शक्यतो दक्षिण दिशेकडे तोंड करूनच पूजा करणं योग्य मानलं जातं. उत्तर, पश्चिम किंवा पूर्वेकडे तोंड करून पूजा केली तर त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही, असं वास्तु आणि पुराणांमध्ये नमूद आहे.