जिल्ह्यात खरीप हंगामातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पीक घेतात. काही शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी तर काही शेतकरी उत्पन्न मिळविण्यासाठी मका पीक घेतात. जिल्ह्यात दरवर्षी मोठे क्षेत्र मकाचे असते. गेल्या काही वर्षात त्यावर रोगराईचे प्रमाणही वाढत चालेले आहे. विशेषतः लष्करी अळीने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे मका पिकाचे उत्पादन कमी करणारी ही लष्करी अळी नेमकी रोखायची कशी याबाबत सविस्तर माहिती.
ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रूगिपेर्डा) या अत्यंत विध्वंसक किडीचा प्रकोप होतो. या किडीमुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान होऊ शकते. ही कीड अंडी अळी कोष पतंग अशा चार अवस्थांमध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करते. अंडी अवस्था २ ते ३ दिवसाची असून, अंडी पुंजक्यावर पांढरे केसाळ आवरण असते जे पिवळसर काळे झाले की त्यातून अळ्या बाहेर येतात. अळी अवस्था सहा टप्प्यात पूर्ण होत असून १४ ते २२ दिवसांची असते. सुरवातीच्या तीन अवस्थांमध्ये अळीचे नियंत्रण करणे सोपे असते.

चौथ्या, पाचव्या अवस्थेतील अळी खादाड असून तिचे नियंत्रण करणे अवघड असते. सहाव्या अवस्थेतील अळी पूर्ण परिपक्व असून तिच्या अंगावरील ठिपके ठळकपणे दिसतात. तिच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलटा इंग्रजी ‘वाय’ दिसतो. ही अवस्था ३ ते ४ दिवसांची असून या अवस्थेत अळी पिकाचे अतोनात नुकसान करते व नंतर जमिनीत जाऊन कोषावस्थेत जाते. कोष अवस्था ९ ते ३० दिवसांची असून, कोष जमिनीत २ ते ८ सेमी खोल, मातीच्या आवेष्टनात गुंडाळलेला आढळतो. कोष लालसर तपकिरी रंगाचे १४ ते १८ मिमी लांबीचे असतात. या किडीचे पतंग करड्या रंगाचे असतात. मादी पतंग मक्याच्या पोंग्यात पुंजक्यात अंडी घालते. एक मादी पतंग साधारणतः १००० ते २००० अंडी घालते. पतंग एका रात्रीत ५० ते ६० कि.मी.चे अंतर पार करून जाऊ शकतात.
लष्करी अळीच्या किडीची अळी अवस्था ही पिकासाठी नुकसानकारक असते. अळीच्या सुरवातीच्या अवस्था पानावर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात शिरून आतील भाग खातात. पोंग्यात खात असताना तिची विष्ठा तिथेच साठून राहते, त्यामुळे पानांची प्रत खराब होते. वाढीचा भाग खाल्यामुळे तुरा बाहेर येत नाही. काही वेळा कीड कणसावरील केस तसेच कोवळी कणसे खाते.
तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतील अळी पाने खाते, त्यामुळे पानांच्या कडा जीर्ण होतात. तसेच पानांवर छोटी छिद्रे दिसू लागतात. अळीच्या वाढीबरोबर छिद्रे मोठी होतात. यावेळी इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी ०.४ ग्रॅम/ली किंवा स्पिनोसॅड ४५ एससी ०.३ मिली/ली किंवा कोराजेन १८.५ एससी ०.४ मिली/ली पाणी याप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी. पाचव्या आणि सहाव्या अवस्थेतील अळीचा बंदोबस्त करण्यासाठी विष अमिष सापळे जसे की, १० किलो गव्हाचा कोंडा २ किलो गुळ २-३ लीटर पाणी १० ग्रॅम थायोडीकार्ब ७५% डब्लू पी या मिश्रणाचे ०.५ ते १ सेमी जाडीचे गोळे तयार करून ते पानांच्या देठाजवळ ठेवावेत.
कामगंध सापळे ठरतात फायदेशीर…
कीडीच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी अथवा रोपे उगवण्याच्या वेळी एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. तसेच मोठ्या प्रमाणात नरपतंग आकर्षित करण्यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत. शेतात संध्याकाळी ६ ते ९ या कालावधीत प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पिकावर अंडी अथवा अळी सापडल्यास ती लगेच मारून टाकावी. एकरी १० पक्षी मचाण उभे केल्यास पक्ष्यांच्या सहाय्याने अळ्यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो.
पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळी पाने खरवडून खाते, त्यामुळे पानांवर पारदर्शी चट्टे/पट्टे तयार होतात. या अवस्थेत वनस्पतीजन्य किटकनाशक (५% निंबोळी अर्क) किवा दास्पर्णी अर्क ३% आणि बॅसीलस थुरिंजींएसिस, डायपेल २ मिली/ली किवा डेल्फिन ५ डब्लूजी २ ग्रॅम/ली पाण्यामधे मिसळून वापरावे. बुरशीजन्य कीटनाशक उदा. मेटाराइजियम अनिसोप्लिए ५ ग्रॅम/ली, नोमोरिय रिले ५ ग्रॅम/ली या प्रमाणे फवारणी करावी.