रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विषमुक्त अन्नासाठी खते व किटकनाशकांचा पिकांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे. खतांच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून यासाठी माती परीक्षण करून जमिनीतील सुक्ष्म घटकांचा अभ्यास करून शेती करणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती क्षारपाड व नापीक होत आहे.
आवश्यकता नसताना रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतीचा खर्च वाढत आहे. माती व पाणी परीक्षण करून शेती करणे आज गरजेचे झाले आहे. माती परीक्षणाबाबत शेतकरी आता जागरूक झाले असून मातीचे आरोग्य जपून शेतकरी शेतीला प्राधान्य देत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र १३ लाख ५९ हेक्टर आहे. यामध्ये बागायती क्षेत्र ३ लाख ५८ हजार हेक्टर असून हे प्रमाण २६ टक्के आहे. नगर जिल्ह्यात जमिनीचे चार प्रकार आहेत. यामध्ये हलक्या प्रकारची जमीन २४ टक्के, – मध्यम जमीन ३८ टक्के, भारी काळी ३६ टक्के, तर तांबड्या प्रकारची जमीन २ टक्के जमीन आहे. जमिनीतील सुक्ष्म घटकांची माहिती घेऊन शेती करणे आवश्यक झाले आहे.
माती परीक्षण केल्याने आपल्या जमिनीत कोणते घटक आहेत व कोणत्या घटकांची आवश्यकता आहे, याची माहिती शेतकऱ्यांना होते. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. परिणामी जमीन क्षारपाड होऊन नापीक होण्याचा धोका आहे. अ त्याचबरोबर आवश्यकता नसताना पिकांना खते दिल्याने खर्च वाढतो. हा प्रकार म्हणजे आजाराचे निदान न होता औषधोपचार करण्यासारखे आहे. त्यामुळे जमिनीचे आजाराचे निदान करून तिच्यातील आवश्यक घटक वाढवण्याची गरज आहे.
माती परीक्षण केल्याने जमिनीतील सामू, क्षार व चुनखडी याचे प्रमाण शेतकऱ्यांना समजते. जमिनीचा सुपीकता निर्देशांक म्हणजे जमिनीतील नत्र, स्फूरद, व पालाशचे प्रमाण समजण्यास शेतकऱ्यांना मदत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनीचा सुपीकता निर्देशांक कमी, मध्यम, मध्यम असा आहे. मागील पाच वर्षांचा विचार करता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबद्दल जागरूकता वाढली आहे. त्याचबरोबर शासनाकडून विविध योजनेतून जमीन आरोग्य पत्रिका अभियान राबवून शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण करून घेतले आहे. असे असले तरी अद्यापही बहुसंख्य शेतकरी माती परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे शेतीवरील खर्च वाढून शेती आतबद्याची ठरत आहे. रासायनिक खतांच्या व किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे आपण खातो त्या फळे व धान्य यामध्ये विषाचे प्रमाण जात आहे. त्यामुळे आपण विषयुक्त अन्न खावून दुर्धर आजाराला बळी पडत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून रासानिक खतांचा वापर टाळून रेस्युड्यू फ्री अन्नधान्य व फळांचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. आगामी काळात विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला प्राधान्य देऊन नैसर्गिक शेती करणे गरजचे झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळाची गरज ओळखून माती परीक्षण करून घेणे गरजेच आहे.
शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांचा वापर वाढवणे आवश्यक
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे गरजेचे आहे. पिकांचे नियोजन करून आपल्या शेतात सेंद्रीय खते व हिरवळीच्या खतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेतीचा लागवड खर्च कमी करून अधिक उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. माती परीक्षण करून शेती केल्यास शेतकऱ्यांना जमिनीतील सुक्ष्म घटकांची माहिती होऊन खतांवरील अवाजवी खर्चकमी करता येतो.
माती परीक्षणातून जमिनीतील या घटकांची होते माहिती
माती नमुन्याचे परीक्षण केल्याने जमिनीतील सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, पीएच, इसी तसेचे पाणी परीक्षणातून कॅल्शीअम, मॅग्नेशिअम, सोडिअम क्लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, विद्राव्य क्षार, सोडीयमचे प्रमाण, मुक्त चुना, जमिनीचा पोत, तांबे, लोह, झिंक, मँगनीज आदी घटकांची माहिती होते. या घटकांची माहिती झाल्यास आवश्यक ते जमिनीतील घटक वाढवून पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मदत होते.