अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मिशन आरंभ अंतर्गत शनिवारी जि. प. च्या ७८१ शाळांत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील पाचवीच्या १४ हजार ९४९ व आठवीच्या ११३४ अशा एकूण १६ हजार ८३ विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिली, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मिशन आरंभ हा उपक्रम २०२३/२४ पासून राबवला जात आहे. या उपक्रम अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी या परीक्षांची तयारी करण्यासाठी सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात येते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी शैक्षणिक वर्ष २०२५/२६ मिशन आरंभ हा उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी, २६ जुलै रोजी शाळा स्तरावर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ ते ९.३० असा पेपर क्रमांक एक, तर सकाळी १० ते ११.३० या वेळेत पेपर क्रमांक दोनची परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळांत ही सराव परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीच्या १४ हजार ९४९, तर आठवीच्या ११३४ अशा एकूण १६ हजार ८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी दिली.