अहिल्यानगर : बजरंगबली की जय,समर्थ हनुमान महाराज की जय,जयजय श्रीराम,हरहर महादेव असा हरीनामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी ( ता.पाथर्डी ) येथे शेकडो भाविकांनी लालबुंद निखाऱ्यावर अनवाणी चालत नवसपुर्ती केली. या गरम प्रवाहाची विस्तव वाट चालताना शहरी ग्रामीण आबालवृद्ध भाविक अक्षरशःभारावुन गेले होते .
नाशिक जिल्हात असलेल्या टाकळी प्रमाणेच येथे समर्थ रामदास स्वामी यांनी गाईचे शेणापासुन हनुमान मुर्तीची स्वहस्ते प्रतिष्ठापना केल्याची वंदता आहे. तसेच ग्रंथराज दासबोधातील रहाडयात्रेच्या वर्णना नुसार या यात्रेस पावणेचारशे वर्षांची परंपरा सांगितली जाते. त्यामुळे नाशिक, सातारा, फलटण, कोल्हापुर सह राज्याच्या विविध भागांतुन आलेल्या भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती रहाडाची अग्निपुजा केल्यानंतर दोन तासानंतर प्रज्वलित बोरीच्या लाकडांचा विस्तव तयार करण्यात आला.

प्रथम मानकरी पूजा करून निखाऱ्यावर चालत गेले.त्यानंतर शेकडो आबालवृद्धांनी मुखी जयघोष करीत निखाऱ्याची अनवाणी वाट चालत आपली नवसपूर्ती केली. साडेपाच वाजता सुरु झालेल्या या अनोख्या नवसपुर्तीचा जल्लोष रात्री आठ पर्यंत प्रवाही होता. विक्रमी गर्दीने या भागातील सर्व रस्ते ओसंडुन वाहीले. छत्रपती चौक ते हनुमान मंदीर असा अर्धा किलोमीटर अंतर भाविकांना पायी चालावे लागले.रात्री अकरा वाजेपर्यंत गर्दीचा ओघ सुरु होता. आषाढ अखेर व श्रावण आरंभ संधी मुहुर्तावर मागील गर्दीने उच्चांक पार केले.