अहमदनगर बातम्या

नागवडे कारखान्याच्या सर्व सभासदांचे १५ कोटी २५ लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- गळीत हंगाम २०२०-२०२१ च्या बॉयलर प्रदीपन व गळीत हंगाम सुरू करण्याच्या कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बोट वर करून आपल्या कारखान्याची एफआरपी जिल्ह्यात सर्वात जास्त २६६१ रुपये आहे.

आपण नगर जिल्ह्यात एक नंबरचा भाव देणार म्हणून घोषणा केली. परंतु २०१९-२० गळीत हंगामात कारखाना बंद असण्याच्या नावाखाली आपल्या कारखान्याने एफआरपी कमी करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. ती कमी करून घेतली.

यामुळे शेतकरी सभासदांचे १५ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक केशवभाऊ मगर यांनी दिली. आजच कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एफआरपीप्रमाणे राहिलेले १४४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती दिली.

कारखान्याची एफआरपी २६६१ रुपये होत असताना ती कमी करून सभासदांचे २१७ रुपये प्रतिटनाने नुकसान केले. परंतु कारखान्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून स्वतःची खासगी मालमत्ता व खासगी कंपन्या वाढवल्याची टिका मगर यांनी केली.

आपण सांगता आपला कारखाना नफ्यात आहे, आपल्याला बँक अजून विनातारण १२० कोटी कर्ज देऊ शकते. मग गेली दोन वर्षे सभासद कोरोनामुळे अडचणीत असताना त्यांना मदत करण्याचे सोडून त्यांच्याच हक्काचे पैसे का कमी केले? कर्मचाऱ्यांचे पगार व वाहतुकदारांचे पैसे का थकविले, असा सवाल केशवभाऊ मगर यांनी नागवडे यांना केला.

पुणे, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा १०० ते ३०० रुपयांपर्यंत जास्त भाव देण्याचे काम केले. निवडणूक काळात जर आपण एवढा कमी भाव देत असेल, तर या निवडणुकीत सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

आपल्या कारखान्याला जर आणखी १२० कोटी रुपये कर्ज मिळू शकते, तर त्यापैकी फक्त १५ कोटी कर्ज काढून एफआरपीप्रमाणे भाव दिला असता, तर चालू हंगामात जास्त गळीत होऊन आपण कर्ज फेडू शकलो असतो. परंतु भाव कमी दिल्यामुळे त्याचा गळीतावर सुद्धा परिणाम होऊन तोटा वाढू शकतो, अशी माहिती मगर यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts