नगर मधील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असून, भंडारदरा केंद्रात २४ तासांत अवघ्या १२ मिमी पावसाची तर रतनवाडीत २५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
भंडारदऱ्यातून २ हजार ४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच निळवंडेचा जलसाठा ९१ टक्क्यांवर असून, त्यातून जायकवाडीकडे २६८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
मुळा धरण ८३.८८ टक्के भरल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या अहवालात नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नगरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
जिल्हाभरात सर्वदूर आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १५१ टक्के पाऊस झाला आहे. प्रमुख धरण प्रकल्प असलेल्या भंडारदरा धरणाची क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून सध्याचा साठा १० हजार ३२३ दशलक्ष घनफूट आहे.
निळवंडेची क्षमता ८ हजार ३२० दलघफू असून जलसाठा ७ हजार ५८१ दलघफू झाला. २६ हजार दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात २१ हजार ८०९ दलघफूवर पोहोचला आहे.
घोड धरण क्षमता ५९७९ दलघफू, तर जलसाठा ४८९३ दलघफूवर पोहोचला आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) निळवंडे धरणातून ८०० क्युसेकपर्यंत विसर्ग घटवण्यात आला. पण दोन दिवसांत हा विसर्ग वाढवून २ हजार ६८० क्युसेक करण्यात आला.