Ahmednagar News : कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून २८.८४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कोपरगावकरांच्या आरोग्याला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मतदारसंघाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात कमी पडत असल्यामुळे
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी आ. काळे यांनी निवडून आल्यापासून केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळविली होती.
त्यानंतर या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नाची दखल घेवून नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी २८.८४ कोटी निधीस मंजुरी देण्यात आली असून या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे.
येत्या दोन वर्षात सर्व सुविधांयुक्त सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्यामुळे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स, अतिदक्षता विभाग असल्यामुळे दुर्धर आजारी रुग्णांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी १०० किलोमीटर जाण्याची कोपरगावकरांना तसदी घ्यावी लागणार नाही.
वेळ वाचणार असून रुग्णावर तातडीने दर्जेदार उपचार होतील. त्यामुळे नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या दूर होणार आहे.
आरोग्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आ. काळे यांच्या वचनपुर्तीतून सुटल्यामुळे आ. काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांचे आभार मानले.