Ahilyanagar News:- राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या विधानसभा निवडणुका आता पार पडल्या व आता सगळ्यांना वेध लागले आहे की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार व मंत्रिमंडळामध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याबाबतीत आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात यावेळी मंत्रिपद नक्कीच मिळणार हे मात्र निश्चित आहे. परंतु ते कुणाला मिळणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता लागून राहिलेले आहे. सध्या अहिल्यानगर जिल्ह्याचे एकंदरीत चित्र बघितले तर या ठिकाणहून भाजपच्या दोघांना तर अजित पवार गटातील एका आमदाराला मंत्रिपद मिळेल अशी एक शक्यता आहे.
परंतु ते आता कोणाला मिळेल? याबाबत मात्र उत्सुकता शीगेला पोहोचलेली आहे. जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत स्थिती बघितली तर त्या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळाले असून एकूण बारा विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल दहा जागा महायुतीने जिंकल्या आहेत. या दहा पैकी चार जागा भाजप तसेच अजित पवार गटाला देखील चार आणि शिंदे सेनेला दोन अशा एकूण दहा जागांचा यामध्ये समावेश आहे.
महायुतीचे नवनिर्वाचित आमदार मुंबईला रवाना
यामध्ये महत्त्वाचे असे की, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमदारांना लागलीच म्हणजेच रविवारीच मुंबईला बोलवण्यात आले व महायुतीचे आमदार आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. काल त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
अजित पवार यांच्या भेटी घेतल्या असून या तिन्ही नेत्यांच्या भेटीसाठी आता राज्यभरातून नवनिर्वाचित आमदार मुंबईत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता महायुतीचे नेते शपथविधी कोणत्या तारखेला होईल? याबाबत तारीख निश्चित करतील व या शपथविधी सोहळ्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून मंत्रीपदाची शपथ शपथ घेण्याची संधी मात्र कोणाला मिळते? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून मिळणार या आमदारांना मंत्रिपदाची संधी
अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी भाजपच्या दोन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते व यामध्ये पहिले नाव हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे असेल हे जवळपास निश्चित समजले जात आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून सलग आठव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत व ते ज्येष्ठ नेते असून जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत व त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी ही जवळपास निश्चित आहे.
जिल्ह्यातील भाजपचे दुसरे नेते जर बघितले तर ते ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले असून त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून गत वेळी मात्र ते पराभूत झाले होते. अहिल्या नगर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयामागे त्यांचा देखील मोठा हातभार असून तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या कायम संपर्कात असतात व त्यामुळे त्यांची ही मंत्रीपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या यादीमध्ये जर आपण तिसरे नाव बघितले तर ते शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेल्या मोनिका राजळे यांचे आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातून त्या एकमेव महिला आमदार असून त्यांचा देखील मंत्रिपदासाठी भाजप विचार करेल अशी एक शक्यता आहे.यात आमदार राम शिंदे यांचा देखील नावाचा समावेश करण्यात येत आहे.
प्रमुख कारण म्हणजे सध्या ते कर्जत जामखेड मतदार संघातून १२४३ मतांनी जरी पराभूत झाले असले तरी त्यांचा हा पराभव निसटता आहे. ते एक भाजपचे ज्येष्ठ नेते असून 2014 च्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले होते.सध्या ते राज्यातील विधान परिषदेचे आमदार असल्यामुळे त्यांना देखील मंत्रीपद मिळेल अशी एक शक्यता आहे.
कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार आमदार निवडून आले असून यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे सगळ्यात जास्त मताधिक्याने विजयी झालेले असून त्यांना मिळालेले मते ही संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे त्यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळेल अशी एक शक्यता आहे.
तसेच अहमदनगर शहर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप हे देखील तिसऱ्यांदा विधानसभेवर पोहोचले असून त्यांना देखील मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात लाल दिवा, भावी मंत्री हेच मुद्दे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडले होते व भावी मंत्री म्हणून त्यांचे फलक नगर शहरात देखील झळकले आहेत.
तसेच अकोले मतदारसंघातून डॉ. किरण लहामटे यांना दुसऱ्यांदा विजय मिळाला आहे व आदिवासी भागातील आमदार म्हणून त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी देखील एक चर्चा सध्या दिसून येत आहे. त्यामुळे जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल? हे आता लवकरात लवकर निश्चित होण्याची शक्यता असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे.
तसेच एक शक्यता ही संगमनेर मधून काँग्रेसचे ज्येष्ठ व दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमोल खताळ यांना देखील मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळेल अशी देखील एक चर्चा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीत कुणाला मंत्रिपद मिळेल?हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.