अहमदनगर बातम्या

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार

Ahmednagar News : १०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्युसेकने पाणी यायला पाहिजे; परंतु आज ते टेलला फक्त ५० क्युसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गोदावरी उजवा व डावा कालवा कृती समिती व अधिकारी यांच्या समवेत बैठक होणार असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

नुकताच लोकसभेत घाटमाथा प्रश्न मांडल्याबद्दल गोदावरी समिती व शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी खासदार लोखंडे यांनी सन्मान आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे पाणी पश्चिमेच्या समुद्राला वाहून जाते तेच ११५ टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खासदार लोखंडे यांची धडपड सुरू आहे. याविषयी त्यांच्या पुढाकाराने घाटमाथा प्रकल्पाचे सव्र्व्हेक्षणदेखील झाले असून मोठा निधी लागणार आहे.

केंद्र व राज्याच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याने गोदावरी समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. गोदावरीचा उजवा कालवा हा ११० किमीचा व डावा कालवा ८० किमीचा असून सध्या फक्त यातून १५० क्यूसेकने पाणी येत आहे व ते टेलला फक्त ५० क्यूसेकने पोहचत आहे.

आता या कालव्यांची दुरुस्ती होणार असून घाटमाथा पाणी आल्यानंतर गोदावरी, मुळा व प्रवरेला तसेच महत्वाचे म्हणजे निळवंडेची आवर्तन संख्या वाढणार आहे. त्यामुळे खासदार लोखंडे यांचा मोठा सन्मान शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

यावेळी शिर्डी विश्रामगृहात सत्कारासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, कॉ. राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, संजय सदाफळ, राजेंद्र दंडवते, राजेंद्र कार्ले, रावसाहेब थोरात, राजेंद्र चौधरी, माधवराव चौधरी, मनील नरोडे, नगरसेवक भागवत आरोटे तसेच राज लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts