Ahilyanagar Newe:- काल संपूर्ण राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व यामध्ये राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता आली. जवळपास आता विधानसभा निवडणुकीचा जो काही अंक होता तो आता बंद झाला आहे व आता फक्त राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याकडे आता सगळ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
तसे पाहायला गेले तर कालचा निकाल हा अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यामध्ये जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार आणि भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत काटे की टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत नेमके कोण विजयी होणार? हे कळायला मार्ग न होता.
परंतु अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मात्र शेवटच्या क्षणी रोहित पवार यांनी विजय मिळवला. रोहित पवार यांना या लढतीत विजय मिळाला खरा परंतु यादरम्यान कर्जत जामखेड मध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडली व त्यामुळे रोहित पवार यांना देखील एक भावनिक धक्का बसला.
मतमोजणीत रोहित पवार पिछाडीवर केल्याचा धक्का सहन न झाल्याने 75 वर्षीय आजोबांचा मृत्यू
काल जेव्हा मतमोजणी सुरू होती तेव्हा रोहित पवार हे बऱ्याच कालावधीपर्यंत पिछाडीवर होते. अहिल्यानगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागलेले होते. यामध्ये रोहित पवार यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणावर या निकालाकडे नजर लावून बसलेले होते
व यामध्ये शरद पवार यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे 75 वर्षीय यजेराव काळे हे देखील सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून बसले होते.
परंतु मध्यंतरीच्या मतमोजणीच्या कालावधीत रोहित पवार पिछाडीवर पडल्याचे कळत असताना त्यांना खूप मोठा धक्का बसला व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या घटनेवरून आज रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
याबद्दल ट्विट करताना रोहित पवार यांनी म्हटले की काल जेव्हा मतमोजणी सुरू असताना मताधिक्य कमी जास्त होत असल्याच्या बातम्या पाहून माझ्या प्रचारामध्ये आघाडीवर असलेले आणि आदरणीय पवार साहेबांची एकनिष्ठ कार्यकर्ते यजेराव दिनकर काळे( वय 75, रा. शिंपोरा) यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
माझ्यासाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे व या घटनेने विजयाचा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी पट अधिक दुःख झाले आहे. निवडणुकीमध्ये कार्यकर्ता किती महत्त्वाचा असतो आणि एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपण अशा पद्धतीने गमावलं तर त्याचं दुःख किती असतं, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे.
ही घटना मनाला अत्यंत वेदनादायी असून काळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.