श्रीरामपूर येथील बस स्थानक परीसरात हॉटेल राधिकासमोर काल शनिवारी (दि.१३) सायंकाळी एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमा झाली होती.
सायंकाळच्या सुमारास नेवासा रस्त्यावरून संगमनेरकडे जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला. श्रीरामपूर शहरातील घटना चालकाने कार थांबवली. लगेच चालक व एक मुलगा कारबाहेर पडले. कारच्या समोरील बाजूस लागलेल्या आगीचा काही वेळात भडका उडाला.
परिसरातील अनेकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र कारचे बोनेट बंद असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. काही वेळात नगरपालिकेचा अग्निबंब घटनास्थळी दाखल झाला. दोघांनी आगीची पर्वा न करता फळ विक्रेत्याने दिलेल्या गजाच्या सहाय्याने बोनेट उचकटले.
त्यामुळे आग वेळेत विझली आणि मोठे नुकसान टळले. भररस्त्यावर कारने पेट घेतल्याने रस्त्यावर नागरीकांची मोठी गर्दी जमा झाली होती. परिणामी काहीवेळ वाहतुक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. ही कार शहरातील एका शिक्षकाची असून आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. कारच्या जवळ काही दुचाक्या उभ्या असल्यामुळे त्या बाजुला घेताना या दुचाकी मालकांची चांगलीच धांदल उडाली.