फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील कनोली येथे समोर आली आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.
आपण फायनान्स कंपनीला पैसे दिले; मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला आहे.
संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये आपणास मारहाण देखील करण्यात आली होती. त्या ठिकाणी आपल्या खिशातील सर्व कागदपत्रे काढून घेण्यात आली असून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही या चिठ्ठीमध्ये आहे.
या घटनेची माहिती मिळताच कनोली गावचे पोलीस पाटील नानासाहेब वर्षे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बलसाने यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.