Ahmednagar News : श्रीगोंदा शहरात बुधवारी (दि. २२) पहाटे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत चांगलाच धुमाकूळ घातला. शिवाजीनगर परिसरात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण करत एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी केली.
या वेळी चोरटयांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहे. भरवस्तीत झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
शिवाजीनगर परिसरातील सोसायटीमध्ये बुधवार, दि.२२ मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सोसायटीमध्ये खालच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व महिलेचा गळा दाबून मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले.
त्यानंतर चोरट्यानी तिथून जवळच असणाऱ्या एका घराकडे आपला मोर्चा वळवला, घराचा दरवाजा तोडताना आवाज झाल्याने घरातील पती-पत्नी जागे झाले. यावेळी चोरट्यानी या दोघांना मारहाण करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समजली.
चोरटयांनी जोडप्याला मारहाण करताना आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना तसेच नगरसेवक प्रशांत गोरे यांना फोनवरून दिली. गोरे यांनी स्वतः पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठले;
परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. भरवस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिक घाबरले असून, लवकरात लवकर चोरांना अटक करून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
चोऱ्यांचे सत्र थांबवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
लोणी व्यंकनाथ शिवारात डोळ्यांत मिरची पूड टाकून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटनेला ३६ तास होत नाही, तोच बुधवारी पहाटे चोरट्यांनी श्रीगोंदा शहरात चाकूचा धाक दाखवत मारहाण करत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली.
श्रीगोंदा तालुक्यात सुरु झालेले चोऱ्यांचे सत्र थांबविणे तसेच रस्तालूट झालेल्या प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.