Ahmednagar News : आतपर्यंत शेवगाव , श्रीगोंदा या ठिकाणी चोरटयांनी धुमाकूळ घालत एकाच दिवशी अनेक दुकाने, मंदिर व घरे फोडून मोठा ऐवज लंपास केला आहे. या चोऱ्या कोणी केल्या याबाबत अद्याप पोलिसांना तपास लागला नाह. मात्र आता चोरटयांनी थेट शहरात घुसून भरदिवसा एका इमारतीतील ६ फ्लॅटमध्ये चोरी करून पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे.
मात्र चोरटयांनी चोरी केल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या नागरिकांना उलट सुलट प्रश्न विचारून फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे एकीकडे चोरटयांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला ते राहिले बाजूला मात्र नागरिकांनाच आता नुकसान होऊन देखील गप्प बसण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूजा कॉम्प्लेक्स या नावाची या इमारत आहे. बुधवारी भरदुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या इमारतीत घुसून इमारतीतील ६ फ्लॅट फोडून रोख रक्कम व दागिने असा लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे.
यात शिंदे यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड आणि ७ लाखांचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले आहेत. या दागिन्यांसोबत त्यांचे बॉक्स आणि पावत्याही चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. तर तांबोळी यांच्या फ्लॅटमधून १७ हजारांची रोकड चोरीला गेली आहे.
घरफोड्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांचे फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत ते नागरिक बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांना आमच्याकडे माळीवाडा येथील गोळीबाराची केस असून त्याचा तपास सुरु आहे. तुम्ही उद्या सकाळी या असे सांगण्यात आले.
त्यानंतर नागरिक गुरुवारी (दि.११ सकाळी फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ७ लाखांचे सोने चोरीला गेलेल्या शिंदे यांना तुमच्याकडे खरेच एवढे दागिने होते का? त्या दागिन्यांच्या पावत्या घेवून या असे सांगितले.
शिंदे यांनी दागिन्यांच्या पावत्या बॉक्समध्येच होत्या. चोरटे बॉक्ससह दागिने घेवून गेले आहेत असे सांगत होत्या. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. इतरांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. त्यामुळे आता या नागरिकांना चोरी होऊनदेखील गप्प बसण्याची वेळ आली आहे.