Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तत्काळ या घाट दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी ! कोल्हार घाटातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे तसेच कोल्हार, चिचोंडी, शिराळ, डोंगरवाडी, धारवाडी, डमाळवाडी, गीतेवाडी, या भागातील सरपंच व उपसरपंचांनीदेखील या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
वेळप्रसंगी या रस्त्याच्या कामासंदर्भात रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. माजीमंत्री कर्डिले यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
खा. विखे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून कोल्हार घाट दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तत्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली आहे.
कोल्हार घाट दुरुस्तीची मागणी करण्यासाठी खा. विखे पाटील व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या माध्यमातून कोल्हार घाट दुरुस्तीसाठी आता निधी मंजूर झाला असल्याने प्रवाशी व वाहनचालकांचा प्रश्न आता मार्गी लागल्याने होणारी गैरसोय आता दूर होईल.