Ahmednagar News : देशभर साईमंदीरे उभारण्याचा साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचा हा तुगलकी निर्णय असून सदरचा निर्णय जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरुच ठेऊ,
असा इशारा देत या निर्णयाविरोधात शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साईमंदीरच्या प्रवेशद्वार कमांक चारसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या उपोषणाला शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्गाने उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दिला आहे. गुरुवार दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता जगताप दाम्पत्याने आपल्या संपर्क कार्यालयापासून टाळ मृदंगाच्या गजरात साई नामाचा गजर करत नगर-मनमाड महामार्गावरून साईबाबा मंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारकडे प्रयाण केले.
उपोषणस्थळी पोहचल्यावर साईबाबांच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन बाबांना प्रार्थना केली. साईबाबांची आरती करत उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना जगताप म्हणाल्या, साईबाबा संस्थान अतिशय चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहे.
श्रावण महिन्यात शिर्डीत साईसच्चरीत पारायणासाठी बसलेल्या महिला भगिनींना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले नाही, ही खेदाची बाब आहे. देश-विदेशातून वर्षांकाठी करोडो साईभक्त दर्शनासाठी येत असतात.
त्यांच्यासाठी संस्थानने काय सुविधा उभारल्या आहेत, असा सवाल करत शिर्डीच्या विकासासाठी ग्रामस्थांनी तळवे झिजविले. मात्र संस्थान प्रशासनाने त्यांचा अनादर केला असून सन्मानाची वागणूक दिली नाही.
माझ्यासारख्या एका महिलेला संस्थानच्या समितीच्या तुगलकी निर्णयाविरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. शिर्डी ग्रामस्थांचा एकच ध्यास शिर्डीचा विकास असाही नारा त्यांनी दिला.