Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा.गजानन कॉलनी), सागर रमेश नागपुरे (वय ३० रा.भिंगार) असे आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून १५ लाख सात हजार रुपये किमतीचे २२.२ तोळे सोने जप्त केले. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा (वय ३५, रा.अहमदनगर) हे १४ जानेवारीस त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून चालले असता मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले होते. याबाबत प्रशांत यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती.
अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधासाठी आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी पोसई सोपान गोरे,
पोहेकॉ संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना संतोष खैरे आदींचे एक पथक तयार केले. त्यांनी अहमदनगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांचा गणेश आव्हाड व सागर नागपुरे यांच्यावरील संशय बळावला.
आहेर यांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी भिस्तबाग परिसरात फिरत आहेत. पथकाने घटनास्थळी जात त्यांना ताब्यात घेतले. त्यांकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर व लोणी परिसरात चैन स्नॅचिंग करुन सोने चोरल्याची कबुली दिली.