Ahmednagar News : आतापर्यंत मोठे उदयोजक किंवा प्रसिद्ध असणाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता चक्क ग्रामपंचायत सदस्याचे अन ते देखील बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याची कर्जत तालुक्यात घडली आहे.
नितीन बन्सी गव्हाणे असे या घटनेत अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उर्फ बंटी भाऊसाहेब उबाळे व उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ यांच्या विरोधात दि.५जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
त्याचा आज दि.१० रोजी निकाल लागणार होता. परंतु त्या आधी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करण्यात आले.
हि घटना कर्जत तालुक्यातील माहिजळगाव बायपास बसस्टॅण्ड नजीक घडली. या बाबत दीपक दादाराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह सहा अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
इतर ग्रामपंचायत सदस्यांसह राऊत हे सांगोल्याहून परत येत होते. ते माहिजळगाव बायपास याठिकाणी पाण्याची बाटली घेण्यासाठी एका टपरीवर थांबले तेव्हा एक चॉकलेटी रंगाची वरना कार व एक काळ्या रंगाची क्रियटा कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी नितीन गव्हाणे यांना मारहाण करत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेले.
यावेळी त्या कार मध्ये सरपंच शिवप्रसाद उबाळे हे बसलेले होते जाताना त्या अज्ञात व्यक्तींनी आमच्या नादी लागायचे नाही असे म्हणत दमदाटी करत राऊत यांच्या कारची चावी या लोकांनी काढून नेली. राऊत यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी अपहरण झालेल्या नितीन गव्हाणे यांचा शोध घेतला पण ते मिळून आले नाहीत.