Ahmednagar News : आधीच महावितरणकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अनेकदा कामास विलंब होतो परिणामी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. न सांगता वारंवार – गैरहजर का राहतो, कामावर दारू पिऊन का येतो अशी विचारणा केल्याचा राग येवून महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची तसेच जातीयवादी संघटनेकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार महावितरणच्या केडगाव येथील कार्यालयात गुरुवारी (दि.१८) सकाळी घडली.
याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता दत्तात्रय देविदास दसपुते (वय ४३. रा. लिंक रोड केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दसपुते हे महावितरणच्या केडगाव येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्याच कार्यालयात स्वप्निल चंद्रसेन गांगुडे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) हा कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. तो बरिष्ठांची कुठलीही परवानगी न घेता वारंवार कामावर गैरहजर राहतो,कार्यालयात दारू पिऊन येतो.
गुरुवारी (दि.१८) सकाळी फिर्यादी हे कार्यालयात काम करत असताना गांगुर्डे हा सकाळी ९ वाजता कार्यालयात आला व हजेरी रजिस्टर वर सही करायला लागला,त्यावेळी फिर्यादी दसपुते यांनी त्याला याबाबत विचारणा केली असता, त्याला त्याचा राग आला व त्याने दसपुते यांना शिवीगाळ करत हाताने चापटी मारायला सुरुवात केली.
तसेच मारहाण करत असताना तुला जीवे ठार मारील, जातीयवादी संघटनेकडून तुझ्यावर गुन्हे दाखल करील अशी धमकी देत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.
झालेला हा प्रकार अभियंता दसपुते यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली.