Ahmednagar News : रात्री जेवणानंतर शतपावली करणारा तरुण दुचाकीस्वाराच्या धडकेत ठार झाला. हि घटना राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे घडली. धडक देणारा दुचाकीस्वार हा वाळूतस्करीशी निगडित आहे. यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी दुचाकीस्वाराच्या मागून येणाऱ्या वाळूच्या डंपरच्या टायरची हवा सोडून देत पोलिसांच्या ताब्यात दिला.
सकाळी तरुणाचा अंत्यविधी झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीविरोधात तब्बल २ तास रास्ता रोको केला.तसेच यापुढे या भागातील वाळू तस्करांवर व अपघातातील संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास पाथरे बुद्रुकमध्ये जिथे वाळूचे डंपर किंबहुना वाळूच्या गाड्या दिसतील, तिथे त्या पेटवून दिल्या जातील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
एक वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रशांत कडू यांनी घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. आता त्यांच्या या अपघाती निधनानंतर परिवाराचा मुख्य आधार गमावला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सिव्हिल इंजिनियर असलेले प्रशांत सुनील कडू (वय २७) रात्री नऊ वाजता जेवणानंतर ते पत्नीसमवेत पाथरे बुद्रुक कोल्हार रोडलगत असलेल्या त्यांच्या घराजवळ रस्त्याने शतपावली करत होते.
अचानक त्यांना पाठीमागून दुचाकीची जबर धडक बसली. दुचाकीवर दोघेजण स्वार होते. धडक इतकी जोराची होती की, यामध्ये प्रशांत कडू जबर जखमी झाले व प्रचंड रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यानच्या काळात घटना घडल्यानंतर दोघांपैकी एक दुचाकीस्वार पळून गेला. दुसऱ्याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. ते अवैध वाळू तस्करीशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुचाकीमागून वाळूचा डंपर येत होता.
स्थानिकांनी डंपर थांबवून त्याची हवा सोडून दिली. याबाबत महसूल अधिकारी व पोलिसांना कळविण्यात आले. रात्रीच्या वेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, तलाठी सलीम इनामदार घटनास्थळी हजर झाले. यावेळी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाळूचा डंपर लोणी पोलीस ठाण्यात नेण्यात आला.
सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान मयत प्रशांत कडू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पाथरे बुद्रुक येथील चौकामध्ये अवैध वाळू तस्करी विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
रात्रंदिवस पाथरे बुद्रुक येथून वाळू उपसा सुरू असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र शब्दात चीड व्यक्त केली. वाळू तस्करांवर व अपघातातील संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास पाथरे बुद्रुकमध्ये जिथे वाळूचे डंपर किंबहुना वाळूच्या गाड्या दिसतील, तिथे त्या पेटवून दिल्या जातील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.