अहमदनगर जिल्ह्यातील पशुपालकांसाठी एक खुशखबर आहे. शासन पशुपालकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण योजना राबवत असते. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात गाय व म्हैस यामध्ये वंध्यत्व निवारण शिबिरे राबण्यात येत आहेत. २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवण्याचे काम सुरु आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करून वंध्यत्व असलेल्या गाई व म्हशींची तपासणी केली जात आहे.
शिबिरांद्वारे नेमके काय केले जाते ?:- जिल्ह्यात एकूण १५ लाख ९९ हजार ६५८ गाय व म्हैस वर्ग पशुधन आहे. त्यापैकी प्रजननक्षम गाई व म्हशींची संख्या ९ लाख ३४ हजार ४६८ आहे. जिल्ह्यात एकूण २२३ पशुवैद्यकीय संस्था आहेत.
या पशुवैद्यकीय संस्थांमार्फत अभियान कालावधीमध्ये पशुपालकांना गाई- म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशींमधील मुका माज, कृत्रिम रेतन तंत्र, गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ्य याबाबतची माहिती दिली जात आहे.
तसेच वंध्यत्व निवारण शिबिरात येणाऱ्या वंध्यत्व असलेल्या गाई-म्हशींची तपासणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने वंध्यत्व निवारण होण्यासाठी योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. वंध्यत्व निवारण झाल्यानंतर गाई-म्हशींमध्ये गर्भधारणा होऊन दूध उत्पादनात वाढ होणार आहे.
कोणत्या गावांमध्ये कसे केले आहे नियोजन ? :- अहमदनगर जिल्ह्यात एकूण १ हजार ४७७ गावांमध्ये या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी १६१ गावांमध्ये शिबिर देखील घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या शिबिरामध्ये तब्बल २ हजार ३३० गाई व १५९ म्हशी अशा एकूण २ हजार ४८९ जनावरांवर वंध्यत्व निवारणासाठी उपचार करण्यात आले आहे.
या शिबिरातच लसीकरण, टॅगिंग देखील करण्यात येत होते. या शिबिरांमधूनच लसीकरण, कृत्रिम रेतन, उपचार, टॅगिंग आदी कामेही भारत पशुधन अॅपमध्ये नोंदण्याबाबत पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांना जि. प.चे सीईओ आशिष येरेकर यांनी सूचना दिल्या आहेत.