Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. म्हशींच्या धारी व इतर कामे उरकून शेतकरी कुटुंब बाहेर बसले. शेतकऱ्याची पत्नी मात्र गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजून शेजारीच असलेल्या कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या.
तितक्यात घराच्या विद्युत मीटरची वायर तुटून तिचा स्पर्श पत्र्याच्या गोठ्याला झाला. क्षणातच गोठ्यातील नऊ म्हशींचा विजेच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. चाऱ्याचे घमीले आणण्यास शेतकऱ्याची पत्नी कडबाकुट्टीकडे गेली होती म्हणून त्या सुदैवाने बचावल्या. पण नऊ म्हशी मृत्युमुखी पडल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले.
ही घटना घडलीये बुधवारी सायंकाळी नेवासे तालुक्यातील भेंडे बुद्रुक येथे. येथ ज्ञानदेव शिरसाठ हे आपली पत्नी, मुलगा आणि सून, दोन नातवंडे असा परिवार नेवासे तालुक्यातील भेंडे बुद्रुक येथे असतो. त्यांच्याकडे १२ म्हशी असून त्यातील दुधावर त्यातून मिळणाऱ्या पैशात त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे.
नेमके काय घडले?
शिरसाठ व त्यांचा मुलगा हे बुधवारी सायंकाळी नेहमी प्रमाणेचे घराला खेटून असलेल्या पत्र्याच्या गोठ्यातील म्हशींचे दूध काढून, झाडलोट व पाण्याने गोठा धुवून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी म्हशींना पाणी पाजून कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या.
त्या कडबकुट्टीकडे गेल्या आणि त्याच दरम्यान घर व पत्री गोठा याला लागूनच असलेल्या विद्युत मीटरमधील एक तार तुटली. वारा आल्याने तारेचा स्पर्श म्हशींच्या गोठ्याच्या पत्र्याला झाला. त्यानंतर काही क्षणातच गोठ्यासह लोखंडी दावण व म्हशींच्या लोखंडी साखळ्यात विद्युत प्रवाह उतरला. दावणीतील बारापैकी नऊ म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यातील तीन म्हशी दुसऱ्या ठिकाणी बांधल्याने त्या वाचल्या.
दैव बलवत्तर म्हणून..
म्हशीसाठी चारा आणण्यासाठी कुट्टीमशिनकडे गेलेल्या त्यांच्या पत्नी दैव बलवत्तर म्हणून त्या संकटातून वाचल्याने मोठा अनर्थ टळला. एका म्हशीची किंमत किमान सव्वालाख रुपये एवढी आहे. असा सुमारे साडे अकरा लाख किंमतीच्या नऊ म्हशी एका क्षणातच गेल्याने शिरसाठ कुटुंबीय हाताश झाले आहे. शिरसाठ कुटुंबियांवर ओढवलेल्या आपत्तीमुळे भेंड्यासह परिसरातील नागरिक हळहळ करत आहेत.