अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- व्यावसायिकाकडून 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील वस्तू व सेवा कर भवनातील राज्य कर अधिकारी रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा. खराडी, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले.
वस्तू व सेवा कर भवन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील तक्रारदार यांचा मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वितरणाचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायातील उलाढाली संबंधाने विक्रीकर ताळेबंद येथील वस्तू व सेवा कर भवनाकडे सादर केला होता.
या ताळेबंदात त्रुटी आढळून आल्याने राज्य कर अधिकारी रमेश बुधवंत यांनी तक्रारदार यांना वाढीव कर भरणा करण्याबाबत नोटीस दिली होती.
सदरची नोटीस निरस्त करणे तसेच तक्रारदार यांचा व्हॅट करापोटी परतावा मिळवून देण्याकरिता मदत करण्यासाठी बुधवंत यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 35 हजार रूपये घेण्याचे ठरले.
लाचेचा पहिला हप्ता 20 हजार रूपयाची रक्कम वस्तू व सेवा कर कार्यालयात स्वीकारताना बुधवंत याला रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस अंमलदार सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.