केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतवून लावला. ही घटना रविवारी (३१ डिसेंबर) पोखरी येथे घडली.कांद्यासह महागाईच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले होते.
केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. हा रथ पोखरी येथे आला असता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद कोणी केली? पेट्रोल डिझेलचे गॅस दर कोणी वाढवले? हे अगोदर जनतेला सांगा आणि मगच तुम्ही हा संकल्प रथ या ठिकाणी लावा अशी भूमिका पोखरी गावातील शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर आयोजकांना हा रथ घेऊन काढता पाय घ्यावा लागला. दोन दिवसांपूर्वीही कान्हूर पठार मधील शेतकऱ्यांनी हा रथ परतवून लावला होता.
पोखरीत रविवारी ग्रामपंचायत कार्यालया समोर शेतकरी व पोखरी सरपंच सतीश पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, अशोक करंजेकर, भाऊसाहेब चौधरी, विकास शिवले, सचिन पवार, सुरेश शिंदे, बाळशिराम हाडवळे,
अशोक आहेर, रामदास पवार, नीलेश शिंदे, माणिक फरतारे, कारभारी हाडवळे, अशोक शिंदे, गणेश फरतारे, दिनकर पवार आदींनी ग्रामसेवक बबन दातीर यांच्यासह रथाच्या संयोजकांवर प्रश्नाचा भडिमार केला. रथ तातडीने काढून घ्यावा अन्यथा पेटवून देण्याचा इशारा यावेळी शेतकरी व उपस्थितांनी दिला.
आयोजकांनी हा कार्यक्रम होऊ द्या अशी मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ हे शब्द लिहिलेले असल्यामुळे ग्रामस्थांनी या रथांना विरोध केल्याचं म्हटलं आहे. या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या, असं म्हणत हे गावकरी या यात्रेला विरोध करत असल्याचे कळते.