अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :पोखर्डी (ता. नगर) शिवारातील नऊ गुंठे जागेवर तारेचे कंपाउंड करून ताबा घेऊन तो काढण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह सात ते आठ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागा मालक सुनंदा धुमाळ यांचे बंधू डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा. समतानगर, सावेडी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार नगरसेवक शिंदे, सचिन रोहिदास शिंदे, अनिल ढवण (रा. वैदुवाडी, सावेडी) व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 डिसेंबर 2021 ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत ही घटना घडली. पोखर्डी शिवारातील गट नंबर 170 मधील नऊ गुंठे जागा ही सुनंदा धुमाळ यांच्या मालकीची आहे.
आरोपींनी या जागेला अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून त्या ठिकाणी ‘स्वप्निल’ नावाचा बोर्ड लावला. अतिक्रमण काढण्यासाठी जाधव यांच्याकडे 50 लाख रूपयांच्या रकमेची मागणी केली.
त्यांना शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.