अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्यात घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटूंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात नगरसेवक शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द आता वाढीव कलम लावण्यात आले आहे.
दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली असल्याने शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे. औरंगाबाद रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती.
त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. फिर्यादी व्यक्तीच्या घरात 11 मार्च, 2022 रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
शिवीगाळ करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी 11 मार्च रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी त्यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलवून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
शिंदे व इतरांनी यापूर्वी देखील फोन करून व घराचे नुकसान करून त्यांना घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. यानुसार तोफखाना पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरूध्द भादंवि कलम 452, 342, 324, 143, 147, 148, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना घेण्यात आलेल्या जबाबानुसार पोलिसांनी 395, 385 व 354 या कलमांची वाढ केली आहे. त्यामुळे नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.