सध्या नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था केवळ नावाला उरलेली आहे की काय अशी अवस्था झाली आहे. भर दिवसा घरफोडी, खून दरोडे, गोळीबार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचून काढावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत.
शेवगाव शहरात भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत.
या गोळीबारात सुदैवाने गोळीबार करणाऱ्याचा नेम चुकला त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान ज्या इसमावर गोळीबार झाला त्यानेच यातील एका संशयिताला पकडून पोलीस ठाण्यात आणले आहे. ही घटना दुपारी दोन सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गेवराई रस्त्यावरील तळणी फाट्याजवळ घडली.
एक इसम या ठिकाणी असलेल्या रसवंतीगृहात उसाचा रस पीत होता, त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
मात्र, ही गोळी त्या व्यक्तीला लागली नाही, ते सावध होऊन बाजूला झाले, त्यानंतर गोळीबार करणारे लगेचच दुचाकीवरून निघून गेले, त्यातील एका संशयिताला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
हा संशयित जखमी असून, त्याला पुढील उपचारार्थ नगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कसा झाला व का झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.